लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘ब्रेन स्ट्रोक’मुळे कोमात जाऊन पुढे ‘ब्रेन डेड’ झालेल्या पतीच्या असह्य दु:खात त्या होत्या. डॉक्टरांनी त्यांना पतीचे अवयवदान करण्याचा सल्ला दिला. त्या दु:खातही त्यांनी स्वत:ला सावरत पतीच्या समाजसेवेचे व्रत लक्षात ठेवत अवयवदानाचा निर्णय घेतला. यात दोन्ही मुलांनी व कुटुंबीयानीही साथ दिली. यामुळे एकाला जीवनदान तर दोघांना दृष्टी मिळाली. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना व सर्वत्र दहशतीचे वातावरण असताना अवयवदानासाठी कुटुंबीयांनी व डॉक्टरांनी घेतलेल्या पुढाकारामुळे समाजापुढे आदर्श निर्माण झाला आहे.
पारडी येथील रहिवासी ६५ वर्षीय घनश्याम मोहनदास मेहता त्या अवयवदात्याचे नाव. जैन सेवा मंडळाचे अध्यक्ष असलेले मेहता यांनी समाजसेवेचा वसा जपत ११५ अनाथ मुलींचे कन्यादान केले. जाताजाताही त्यांचे अवयवदान करीत त्यांच्या कुटुंबीयांनी मानवतावादी दृष्टिकोन जपला.
‘झेडटीसीसी’ने दिलेल्या माहितीनुसार, मेहता यांना मेंदूत रक्तस्राव झाल्याने लकडगंज येथील न्यू इरा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सर्व प्रकारच्या उपचारपद्धतीनंतरही त्याची प्रकृती न्यूरोलॉजिकल बिघडली आणि डॉक्टरांच्या पथकाने १९ फेब्रुवारी रोजी ‘ब्रेन डेड’ घोषित केले. याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना देत अवयवदानासाठी समुपदेशनही केले. त्यांच्या पत्नी इंदुमती, मुले श्रेयनिक आणि सौरभ यांनी त्या दु:खातही अवयवदानासाठी होकार दिला. याची माहिती ‘झोनल ट्रान्सप्लान्ट कोऑर्डिनेशन सेंटर’च्या (झेडटीसीसी) अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी व सचिव डॉ. संजय कोलते यांना दिली. त्यांच्या मार्गदर्शनात झोन कॉर्डिनेटर वीणा वाठोडे यांनी पुढील प्रक्रिया पूर्ण केली. मेहता यांचे दोन्ही नेत्र व यकृत दान केले. त्यांचे दोन्ही मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी योग्य नसल्याने त्याचे दान करता आले नाही.
न्यू इरा रुग्णालयाच्या रुग्णाला मिळाले जीवनदान
न्यू इरा रुग्णालयात मागील काही वर्षांपासून यकृताच्या प्रतीक्षेत असलेल्या एका रुग्णाला मेहता यांचे यकृत दान करण्यात आले. प्रत्यारोपणाची ही शस्त्रक्रिया हॉस्पिटलचे संचालक डॉ आनंद संचेती, डॉ. निधीश मिश्रा व डॉ. नीलेश अग्रवाल यांच्या पुढाकारात प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. राहुल सक्सेना यांच्या मार्गदर्शनात डॉ. स्नेहा खाडे, डॉ. पराग मून, डॉ. अमोल कोकास, डॉ. साहिल बन्सल, डॉ.अश्विनी चौधरी, लोकेश तारारे, गीता बावनकर, अर्चना नवघरे आणि पल्लवी जवर यांनी केली.
११४ मूत्रपिंड व ५४ यकृताचे दान
‘झेडटीसीसी’च्या पुढाकारात २०१३पासून अवयवदानाला सुरुवात झाली. आतापर्यंत ‘ब्रेन डेड’ रुग्णाकडून ११४ मूत्रपिंड व ५४ यकृताचे दान झाले. यातील ४१ यकृताचे नागपुरात प्रत्यारोपण झाले. नागपूर विभागात सध्या १५ प्रत्यारोपण केंद्र आहेत.