कळमेश्वर : विदर्भात सर्वदूर प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र आदासा येथे संकष्ट चतुर्थीनिमित्त दरवर्षी यात्रा भरते. मात्र, यंदा ही यात्रा कोरोनामुळे रद्द करण्यात आली होती. मात्र, भाविकांना गणेशाच्या दर्शनाकरिता मंदिर खुले ठेवण्यात आले होते. यात्रा न भरल्याने सायंकाळपर्यंत पन्नास हजारांचे आत भाविकांनी शमी विघ्नेश्वरचे दर्शन घेतल्याचा अंदाज गणपती देवस्थान ट्रस्टने लावला आहे. श्रीक्षेत्र आदासा येथील शमी विघ्नेश्वर गणेश मंदिराला ७०० वर्षांचा प्राचीन इतिहास आहे. आदासा हे गाव पूर्वी अदोषपूर या नावाने ओळखले जायचे. या नावाचा पुढे अपभ्रंश होऊन आदासा हे नाव प्रचलित झाले. सुमारे सातशे वर्षांपूर्वी येथे असलेल्या विस्तीर्ण अशा टेकडीवर हेमाडपंथी बारा फूट उंच सात फूट रुंद अशी गणेशाची मूर्ती प्रकट झाली अशी आख्यायिका आहे. या तीर्थक्षेत्रातील शमी विघ्नेश्वराची महाराष्ट्रातील २१ गणेशात गणना होते. प्राचीन काळामध्ये पाप हरण करण्यासाठी शिव-पार्वतीच्या रूपाने शमी वृक्षातून ही मूर्ती प्रकट झाल्याचे सुद्धा जुने लोक सांगतात.
राजा बलीने इंद्रप्रस्थ काबीज करण्यासाठी या टेकडीवर १०० यज्ञाचा संकल्प केला होता. यज्ञ आरंभ होताच त्यात विघ्न निर्माण करण्यासाठी भगवान विष्णू यांनी शक्ती प्राप्तीसाठी वामन रूप धारण करून शमी विघ्नेश्वराची आराधना केली. त्यावेळी शमी विघ्नेश्वर प्रसन्न होऊन राजा बळीच्या शंभर यज्ञाला विघ्न निर्माण केले. वामनाने स्थापना केलेल्या रक्ततुंड गणेशाचा ग्रंथात उल्लेख आढळतो. रविवारी पहाटे येथे पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांच्या हस्ते गणेशाची विधिवत पूजा अर्चना करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रश्मी बर्वे, उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, पंचायत समिती सभापती श्रावण भिंगारे, उपसभापती जयश्री वाळके, बाजार समिती सभापती बाबाराव पाटील, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष बाबाराव कोढे, जि.प. सदस्य महेंद्र डोंगरे, पिंकी कौरती, पंचायत समिती सदस्य वंदना बोधाने आदी उपस्थित होते.