योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जगभरात थैमान घालणाऱ्या व महामारीचे कारण ठरणाऱ्या ‘कोरोना’चे उपराजधानीत तीन ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण सापडले आहेत. यासंदर्भात जनजागृती सुरू असली ‘कोरोना’चा अनेकांनी फार जास्त धसका घेतला आहे.काही जणांमध्ये अक्षरश: ‘फोबिया’ निर्माण झाला असून ‘सोशल मीडिया’च्या उलटसुलट ‘पोस्ट’मुळे तर भीती आणखी वाढत आहे. मानसिक पातळीवर ‘कोरोना’चा सामना करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले असून शहरातील काही मानसोपचारतज्ज्ञांकडे रुग्णदेखील येण्यास सुरुवात झाली आहे. ‘लोकमत’ने वरिष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सुधीर भावे यांच्याशी संवाद साधला असताना त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला. जागतिक आरोग्य संघटनेने ‘कोरोना’मुळे जगभरात महामारी घोषित केली आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या मनात धास्ती भरणे अगदीच सामान्य आहे. मात्र ही धास्ती ज्यावेळी सर्व गोष्टींवर हावी होऊ लागते व दैनंदिन जीवनमानात प्रत्येक गोष्टीकडे त्याच नजरेने पाहिले जाते, तेव्हा नक्कीच मानसिक पातळीवर समस्या निर्माण होण्यास सुरुवात होते. अशा वेळी संबंधित व्यक्तीशी संवाद साधणे व त्याच्यात विश्वास निर्माण करणे ही बाब फार महत्त्वाची ठरते. यासाठी जवळच्या लोकांनी वेळीच पुढाकार घ्यावा.
सोशल मिडियामुळे वाढतेय धास्ती‘कोरोना’बाबत ‘सोशल मीडिया’मुळे जास्त दहशत पसरत असल्याचे चित्र आहे. ‘कोरोना’ नेमका कशामुळे होतो व याची लक्षणे काय आहे याबाबत बऱ्याच चुकीच्या गोष्टी पसरविल्या जात आहेत. त्यामुळे काही दिवस तरी ‘सोशल मीडिया’वर ‘कोरोना’शी संबंधित ‘पोस्ट’ टाळणेच योग्य राहील. जर नेमकी माहिती हवी असेल तर जागतिक आरोग्य संघटनेच्या संकेतस्थळावर योग्य माहिती उपलब्ध आहे, असे डॉ. सुधीर भावे यांनी प्रतिपादन केले.कशी ओळखावी लक्षणे?‘कोरोना’मुळे एखादा व्यक्ती मानसिक पातळीवर फारच घाबरला आहे हे ओळखणे फारच महत्त्वाचे असते. ‘कोरोना’चा विषाणू माझ्या आजूबाजूला तर कुठे नाही ना याचाच विचार त्या व्यक्तीचा मनात असतो. अगदी भाजीबाजारात गेल्यावरदेखील तेच विचार असतात. लवकर झोप येत नाही. घाबरल्यासारखे वाटते अन् छातीत धडधड होते. मागील आठवड्यात आलेला एक व्यक्ती तर दिवसभर ‘मास्क’ लावून राहायचा अन् दर १० मिनिटांनी ‘सॅनिटायझर’चा उपयोग करायचा. एका रुग्णाला तर चक्क ‘पॅनिक अटॅक’देखील आला. याला तांत्रिकदृष्ट्या ‘इलनेस एन्झायटी डिसॉर्डर’ असे म्हणतात. एखादा व्यक्ती गरजेपेक्षा जास्त घाबरत असेल तर त्याच्या नजीकच्या व्यक्तींनी तात्काळ वैद्यकीय तज्ज्ञांकडे घेऊन जावे, असे डॉ. भावे यांनी सांगितले.
संवाद सर्वात महत्त्वाचा‘कोरोना’सारख्या आजारापासून भीती वाटणे स्वाभाविक आहे. जर गरजेपेक्षा जास्त घाबरणारा कोणी आढळला तर त्याच्यावर दोन पद्धतीने उपचार करता येतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे संवाद व समुपदेशन. अशाप्रकारे घाबरणारा तू एकटाच नाही व हे सर्व स्वाभाविक आहे असे त्याला सांगायला हवे. शिवाय त्याच्या मनातील नेमकी काळजी संवादातून समोर यायला हवी. यासाठी समुपदेशकांची मदत घेता येते. एखादा रुग्ण फारच जास्त प्रमाणात ‘इलनेस एन्क्झायटी डिसॉर्डर’ने ग्रस्त असेल तर त्याला तात्पुरती काही औषधे देता येतात. जर कुणाला अशी लक्षणे असतील तर त्यांनी भरवसा असलेल्या व्यक्तीजवळ मन मोकळे करावे. शिवाय ज्याच्याशी सहज बोलता येईल अशा डॉक्टरांशीदेखील चर्चा करावी, असा सल्ला डॉ. सुधीर भावे यांनी दिला.