नागपूर : कोरोनाची दुसरी लाट म्हणता येईल, अशा वेगाने रुग्णसंख्या वाढत आहे. केंद्रीय आरोग्य पथकाने कठोर उपाययोजना करण्याचे सुचविले असले तरी मागील दोन आठवड्यात फारसा बदल झाला नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी, कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. मंगळवारी रुग्णसंख्येने अडीच महिन्यातील उच्चांक गाठला. ५३५ नव्या रुग्णांची भर पडली तर, ६ रुग्णांचा जीव घेतला. रुग्णांची एकूण संख्या १३९७८८ झाली असून मृतांची संख्या ४२४२ वर पोहोचली आहे.
नागपूर जिल्ह्यात कोरोनाच्या उसळीमुळे खळबळ उडाली आहे. आरोग्य यंत्रणेत पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण आहे. केंद्रीय पथकाच्या सूचनेनंतरही अनेक योजना कागदावरच आहेत. याचा फटका सामान्यांना बसताना दिसून येत आहे. विशेषत: हजारो विद्यार्थी शाळेत जात असल्याने पालकांमध्ये काळजी वाढली आहे. शाळेतून आजार पसरल्यास जबाबदार कोण? हा प्रश्न आहे. मंगळवारी मागील सात दिवसांच्या तुलनेत अधिक चाचण्या झाल्या. ४०३४ आरटीपीसीआर व १३४९ रॅपिड अँटिजन मिळून ५३८५ चाचण्या झाल्या. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील ४८२, ग्रामीणमधील ५१ तर जिल्हाबाहेरील २ रुग्णांचा समावेश आहे. मृतांमध्ये शहर, ग्रामीण व जिल्ह्याबाहेरील प्रत्येकी २ मृत्यू आहेत. ३८२ रुग्ण रुग्णालयातून बरे होऊन घरी परतल्याने रुग्ण बरे होण्याचा दर ९३.८१ टक्क्यांवर गेला आहे. आतापर्यंत १३११४१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ४४०५ कोरोनाचे रुग्ण उपचार घेत असून यातील १३७३ रुग्ण विविध रुग्णालयात भरती आहेत, तर ३०३२ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.
- नव्या रुग्णांचा भार मेयो, मेडिकल व एम्सवर अधिक
कोरोनाच्या नव्या रुग्णांचा भार मेयो, मेडिकल व एम्सवर अधिक असल्याचे दिसून येत आहे. सध्या मेडिकलमध्ये ९६, मेयोमध्ये ८०, एम्समध्ये ५३, मनपाच्या आयसोलेशन रुग्णालयात २३, इंदिरा गांधी रुग्णालयात १४, पाचपावली कोविड हेल्थ सेंटरमध्ये ५, लता मंगेशकर हॉस्पिटल, सीताबर्डीमध्ये २२, हिंगणामध्ये ३३ तर उर्वरित रुग्ण खासगीमध्ये उपचार घेत आहेत. शासकीयसोबतच खासगी रुग्णालयातही रुग्णांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे.
- सहा दिवसांत २७९३ रुग्ण
जिल्ह्यात मागील सहा दिवसांत २७९३ रुग्णांची भर पडली. ११ फेब्रुवारी रोजी ५००, १२ फेब्रुवारी रोजी ३१९, १३ फेब्रुवारी रोजी ४८६, १४ फेब्रुवारी रोजी ४५५, १५ फेब्रुवारी रोजी ४९८, तर १६ फेब्रुवारी रोजी ५३५ नव्या रुग्णांची नोंद झाली. मंगळवारी रात्री आलेल्या पावसामुळे सर्दी, खोकला व व्हायरलचे रुग्णवाढ होऊन कोरोनाच्या रुग्णसंख्येत भर पडण्याची शक्यता तज्ज्ञानी वर्तवली आहे.
- दैनिक चाचण्या : ५३८५
- बाधित रुग्ण : १३९७८८
_- बरे झालेले : १३११४१
- उपचार घेत असलेले रुग्ण : ४४०५
- मृत्यू : ४२४२