लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळाला. याची दखल घेत शासन निर्देशानुसार गुरुवारी बैठक घेण्यात आली. महापालिका आपली जनजागृतीची जबाबदारी पार पाडत आहे. सर्व रुणालयात बॅनर लावण्यात आले. सॉनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन केले जात आहे. मनपा रुग्णालयातील डॉक्टरांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहे. महापालिका मुख्यालयात नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला असून येथे २४ तास डॉक्टर उपस्थित राहतील. नऊ डॉक्टरांची येथे नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आरोग्य समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अपर आयुक्त राम जोशी उपस्थित होते.शहरातील कोणत्याही रुग्णालयात कोरोनाचा संशयित रुग्ण आढळून आल्यास मनपाला सूचना देण्याचे निर्देश दिले आहे. अशा रुग्णांना मेयो व मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात येईल. शहरात स्वच्छता ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. हॅन्डवॉश व मास्क लावूनच रुग्णांची तपासणी करणे आवश्यक आहे. महापालिका रुग्णालयात आवश्यक औषधाचा साठा उपलब्ध असल्याची माहिती कुकरेजा यांनी दिली.संशयित रुग्णाला औषध दिल्यानंतर आराम दिसत नसल्यास पुढील उपचार केले जातील. रुग्णाची पार्श्वभूमी जाणून घेण्याच्या सूचना आरोग्य विभागाला केली आहे. संशयित निगेटिव्ह आढळला तरी त्याला १४ दिवस निगराणीत ठेवले जाईल. संशयितांना स्वतंत्र जागेत ठेवण्यासंदर्भात राज्य शासनाची चर्चा सुरू आहे. शाळा, महाविद्यालये, मॉल व गर्दीच्या ठिकाणी सॅनिटायझरचा वापर करण्याच्या सूचना केल्याची माहिती कुकरेजा यांनी दिली.कोरोना संदर्भात गुरुवारी वीरेंद्र कुकरेजा यांनी मनपाच्या सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली.यावेळी अतिरिक्त आयुक्त राम जोशी, आरोग्य उपसंचालक डॉ.भावना सोनकुसळे, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, आरोग्य अधिकारी डॉ. सरिता कामदार, अतिरिक्त सहायक आरोग्य अधिकारी डॉ.विजय जोशी, डॉ.नरेंद्र बहिरवार, टाटा ट्रस्टचे डॉ.टिकेश बिसेन यांच्यासह मनपाच्या दहाही झोनचे झोनल अधिकारी, विविध प्राथमिक आरोग्य केंद्र तथा रुग्णालयांचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.गर्दीची ठिकाणे टाळा : तुकाराम मुंढेनागरिकांनी हात स्वच्छ धुणे, खोकताना-शिंकताना काळजी घ्यावी, खोकणाऱ्या, शिंकणाऱ्या व्यक्तीपासून तीन फूट अंतर ठेवणे अशा महत्त्वाच्या बाबी लक्षात ठेवाव्यात. सिनेमागृह, मॉल्स, स्विमिंग पूल, मंगल कार्यालये येथे आवश्यकता असल्यासच जावे. शक्यतो गदीर्ची ठिकाणे टाळावी. यात्रा, शासकीय कार्यक्रम पूर्णपणे रद्द करावेत. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नागरिकांनी देखील महत्त्वपूर्ण आरोग्य सवयी कटाक्षाने पाळाव्यात. सार्वजनिक कार्यक्रम टाळा. हस्तांदोलन टाळा. काहीही खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. वेळोवेळी तोंडाला स्पर्श करू नका. आवश्यकता नसल्यास सद्यस्थितीत प्रवास टाळा. शाळांनी देखील विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी, यासाठी जनजागृतीपर फलक लावावे. जनजागृतीवर प्रसार माध्यमांनी भर दयावा, असे आवाहन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.अफवांवर विश्वास ठेवू नका : संदीप जोशीनागपूर शहरामध्ये कोरोना रुग्ण आढळला आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. रुग्णावर उपचार सुरू आहे. कोरोना व्हायरसच्या संसगार्पासून बचावासाठी प्रत्येकाने काळजी घ्यावी. वेळोवेळी हात धुवा. गर्दीत जाणे टाळा. ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. विशेष म्हणजे, सोशल मीडियावर फिरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका. असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.मनपाचे कार्यक्रम रद्द : राम जोशीरोगाची कुणीही भीती बाळगू नका, काळजी हाच त्यावरील उपाय आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, सार्वजनिक कार्यक्रमात काही काळ सहभागी होणे टाळा, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. मनपाने इनोव्हेशन अवॉर्ड व महिला बाल कल्याण विभागाचा पूर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती अपर आयुक्त राम जोशी यांनी दिली.मनपाचा जनजागृतीवर भरमहापालिका रुग्णालयात स्पेशालिस्ट नाहीत. सुसज्ज यंत्रणाही नाही. कोरोना आजारासाठी अशी स्वतंत्र यंत्रणा नाही. नोडल ऑफिसर म्हणून मेडिकल रुग्णालयांचे डीन आहेत. आम्ही जनजागृती व नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करीत असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.मास्क डिस्पोज करण्याचे आवाहनकोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर वापरलेले मास्क योग्यप्रकारे डिस्पोज करा, असे आवाहन मनपाच्या आरोग्य विभागाने केले आहे. मात्र मास्कची विल्हेवाट लावण्यासाठी अशी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात आलेली नाही.
Coronavirus : कोरोना नियंत्रणासाठी मनपात नियंत्रण कक्ष : डॉक्टरांच्या सुट्या रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 8:47 PM
नागपूर शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळाला. याची दखल घेत महापालिका मुख्यालयात नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला असून येथे २४ तास डॉक्टर उपस्थित राहतील. नऊ डॉक्टरांची येथे नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आरोग्य समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
ठळक मुद्दे२४ तास डॉक्टर तैनात: कोरोनाची भीती बाळगू नका, खबरदारी घ्या