नागपूर : कोरोना आजाराची भीती व त्यावरील उपचार हे मोठे संकट असल्यासारखे प्रत्येकाला वाटत आहे. काही खासगी इस्पितळातील लूट आणि मनपा किंवा शासकीय रुग्णालयात नेल्यास रुग्ण जीवानिशी जाण्याची भीती या कात्रीत शहरातील सर्व गरीब व मध्यमवर्गीय सापडले आहेत. विशेष म्हणजे, राज्य सरकारने कोरोना रुग्णांसाठी खासगी केंद्रांमध्ये सिटी स्कॅनचा दर २५०० रुपये निश्चित केला आहे. असे असताना, काही खासगी केंद्र ३५०० ते ४५०० रुपये शुल्क वसूल करीत असल्याच्या तक्रारी आहेत. कोरोना विषाणू फुप्फुसांना पोखरत असल्याने डॉक्टर कोरोनाबाधित रुग्णांना छातीचा ‘एचआर सिटी स्कॅन’ करण्याचा सल्ला देतात. मागील वर्षी याचा फायदा काही खासगी केंद्र घेत असल्याच्या तक्रारी झाल्या. राज्यात सिटी स्कॅन चाचणीचे दर निश्चित करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समिती नेमली. या समितीने खासगी केंद्रांना कोरोना रुग्णांच्या एच. आर. सिटी स्कॅनसाठी जास्तीत जास्त २५०० रुपये दर आकारण्याचे निर्देश दिले. परंतु काही मोजकी केंद्रे वगळता बहुसंख्य केंद्र दुपटीने रक्कम रुग्णांकडून वसूल करीत असल्याचे दिसून येत आहेत. याबाबत माहिती असूनही मनपाचे अधिकारी कारवाईसाठी धजावत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सिटी स्कॅन यंत्राच्या स्लाईसनुसार कोरोनाबाधितांच्या चाचणीचे दर शासनाने निश्चित केले आहेत. १६ स्लाईसच्या आत असलेल्या सिटी स्कॅनचे दर २००० आहेत. १६ ते ६४ स्लाईस सिटी स्कॅनचे दर २५०० तर ६४ स्लाईसहून जास्त असलेल्या सिटी स्कॅनचे दर ३००० ठरवून दिले आहेत. -डॉ. राजू खंडेलवाल, वरिष्ठ रेडिओलॉजिस्टसरकारने कोरोनाबाधितांचा ‘एच. आर. सिटी स्कॅन’साठी निश्चित केलेला २५०० रुपये दरच आकारला जात आहे. हा दर तसा कमी आहे. यासाठी संघटनेकडून न्यायालयात दाद मागितली आहे. शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसारच दर आकारावे, असे आवाहन आहे. -डॉ. संदीप महाजन, अध्यक्ष, विदर्भ रेडिओलॉजिकल ॲण्ड इमेजिंग असोसिएशन
coronavirus: नागपुरात कोरोना रुग्णांची लुबाडणूक, सिटी स्कॅनचे मनमानी दर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 8:12 AM