लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणू संसर्गाचा धसका नागपुरातील सांस्कृतिक क्षेत्राने घेतला आहे. रंगकर्मींनीही नियमित कराव्या लागणाऱ्या नाटकाच्या तालमी स्थगित केल्या असून, आगामी काळात ठरलेले नाटकाचे प्रयोग रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक सांस्कृतिक कार्यक्रम अनिश्चित काळासाठी स्थगित झाले आहेत.महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्ण आढळताच यंत्रणा सजग झाली असून, शासनाने तात्काळ प्रभावाने सर्व शासकीय कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय घेतला आणि इतर सामाजिक संस् थांनाही आपले नियोजित सोहळे काही काळासाठी स्थगित करण्याचे आवाहन केले आहे. नागपुरातही एकपाठोपाठ तीन नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट होताच, अनेक सार्वजनिक सोहळे रद्द करण्यात आले आहेत. मार्च महिन्यात २३ मार्च रोजीच्या शहीद दिनाच्या पार्श्वभूमीवर एकापाठोपाठ वेगवेगळ्या नाट्यसंस्थांचे नाट्यप्रयोग डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात होणार आहेत. मात्र, ‘आरोग्य प्रथम’ हा विचार करत काळजी म्हणून त्या सर्व संस्थांनी आपले नाट्यप्रयोग रद्द करण्याचा विचार सुरू केला आहे. त्याअनुषंगाने संबंधित सभागृह प्रशासनाकडून या सर्व संस्थांना आपले भाडे परत करण्याची किंवा प्रयोगासाठी नंतरच्या तारखेचा पर्याय उपलब्ध व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नागपुरात देशपांडे सभागृहासोबतच कविवर्य सुरेश भट सभागृह, सायंटिफिक सभागृह, साई सभागृहात व्यावसायिक नाटके व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होत असतात. मात्र, कोरोनाच्या धास्तीमुळे नागरिक सभागृहापर्यंत येणार नाहीत, ही भीती आणि संसर्गाचा प्रकोप वाढत असल्याने कलावंत मंडळीही सुरक्षित राहावी या हेतूने हे सोहळे स्थगित करण्याचा विचार केला जात आहे. त्याअनुषंगाने संबंधित सभागृह प्रशासनाकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.कलावंतांचे नुकसान होऊ देणार नाही : भानुसेकोरोना संसर्गाची धास्ती सगळीकडेच आहे. शासनाने आपले सगळे कार्यक्रम स्थगित केले आहे. अशात नागरिक स्वत: याबाबत जागरूक होत असतील आणि देशपांडे सभागृहात नियोजित कार्यक्रम स्थगित करू इच्छित असतील तर शासनाचा विभाग म्हणून आम्ही त्यांचे नुकसान होऊ देणार नाही. कलावंतांना सहकार्य करू. ज्यांचे कार्यक्रम सभागृहात निश्चित आहेत आणि त्यांना आपले सोहळे रद्द करावयाचे आहे, अशांनी देशपांडे सभागृहात प्रशासनाकडे विधिवत अर्ज केले तर त्यांनी भरलेले भाडे परत केले जाईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जे. एस. भानुसे यांनी ‘लोकमत’कडे सांगितले.
जालियनवाला बाग हत्याकांडावरील प्रयोग स्थगितभगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांच्या हौतात्म्य दिनाच्या अनुषंगाने २३ मार्च रोजी जालियनवाला बाग हत्याकांडावर आधारित ‘१९१९ आजादी की ओर’ या नाटकाचा प्रयोग देशपांडे सभागृहात करणार होतो. मात्र, कोरोनाच्या धसक्यामुळे आम्ही नाटकाच्या तालमी स्थगित केल्या आहेत आणि नाट्यप्रयोगही स्थगित करण्याचा विचार करत आहोत. देशपांडे सभागृह प्रशसनाने याबाबत सहकार्य करण्याची अपेक्षा युवा नाट्यलेखिका व दिग्दर्शक मंगल सानप यांनी व्यक्त केली.