नागपूर : ‘कोरोना’विरोधात लढा देत असताना पुकारण्यात आलेल्या ‘जनता कर्फ्यू’ला जनतेसोबतच लोकप्रतिनिधींनीदेखील उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. या निमित्ताने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यातील ‘मास्टरशेफ’चे कुटुंबीयांना बºयाच कालावधीनंतर दर्शन झाले. दिवसभर राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची माहिती घेत असताना देशमुख यांनी काही निवांत क्षण काढले व चक्क घरच्या स्वयंपाकघराची सूत्रे घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. विशेष म्हणजे ‘जनता कर्फ्यू’त राज्याचे गृहमंत्री म्हणून ते व्यस्त असताना घरातील गृहमंत्र्यांना मात्र त्यांनी आराम दिला.
सकाळापासूनच अनिल देशमुख हे निवासस्थानाहून राज्यातील ‘अपडेट्स’घेत होते व अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना करत होते. यादरम्यान त्यांना थोडी सवड मिळाली अन् लगेच त्यांनी आपला मोर्चा स्वयंपाकघराकडे वळविला. आवश्यक ते सर्व मसाले टाकून त्यांनी फुलकोबीची भाजी बनविली व काही वेळातच चवदार भाजीसह स्वयंपाक तयार केला. त्यांच्या पाककलेने त्यांच्या पत्नी आरती तसेच मुलगी डॉ.पायल व सून राहत यादेखील प्रभावित झाल्या. यापुढे १५ दिवस तुम्हीच स्वयंपाक करा, असे म्हणत आरती देशमुख यांनी गृहमंत्र्यांना प्रशस्तीपत्रदेखील दिले. कुटुंबियातील प्रत्येकाने त्यांच्या पाककलेची प्रशंसा केली व प्रत्येक सदस्य गप्पांमध्ये रंगला. विशेष म्हणजे यानंतर लागलीच देशमुख यांनी परत वरिष्ठ पोलीस अधिकाºयांशी संपर्क साधत राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला.
खासगी डॉक्टरांनीदेखील पुढाकार घ्यावा‘कोरोना’शी लढण्यासाठी प्रशासनाप्रमाणेच समाजानेदेखील पुढाकार घेतला आहे. सरकारी दवाखान्यांतील डॉक्टर्स अहोरात्र काम करतच आहेत. खाजगी दवाखाने व डॉक्टरांनीदेखील पुढाकार घेऊन सरकारी यंत्रणांना मदत करावी, असे आवाहन अनिल देशमुख यांनी केले. यासंदर्भात खाजगी डॉक्टर्सनी स्वत:हून स्थानिक जिल्हाधिकारी, आयुक्तांना संपर्क करावा व स्वत:चे योगदान द्यावे. यामुळे ‘कोरोना’चा सामना आणखी सक्षमपणे करता येईल, असेही ते म्हणाले. पुढील काही दिवस परीक्षेचे असून निश्चयाने ‘कोरोना’ला हरविले जाऊ शकते. नागरिकांनी कायद्याचे पालन करावे व घरी बसून शासनाला सहकार्य करावे, असे प्रतिपादनदेखील त्यांनी केले.