- नरेश डोंगरेनागपूर : सायबर गुन्हेगार तुमच्या रकमेवर डल्ला मारण्यासाठी नवनवीन क्लृप्त्या लढवत आहेत. गुन्हेगार पोलिसांच्या दोन पावले पुढे असतात, असे म्हटले जाते. मात्र, सायबर गुन्हेगार पोलिसांच्या कितीतरी किलोमीटर पुढे असल्याचे नुकत्याच घडलेल्या गुन्ह्यातून दिसून येते.आधी सायबर गुन्हेगार लॉटरी लागली, विदेशातून लाखोंचे गिफ्ट आले अशी थाप मारून रक्कम जमा करण्यास सांगायचे. काहीजण फेसबुकवरून मैत्री करून विदेशी म्हणवून घेत सणाला लाखोंचे गिफ्ट पाठवले असे सांगायचे़ ते एअरपोर्टवर पोहचल्याचे सांगायचे. नंतर तेथे कस्टम अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. आपण एवढी मोठी रक्कम, दागिने घेऊन आलो त्यामुळे आधी कस्टम ड्युटी जमा करावी लागेल, तेव्हाच ते आपल्याला विमानतळावरून सोडतील, असे सांगायचे. लाखो रुपये लुटत आता सायबर गुन्हेगारांनी आॅनलाइन शॉपिंगच्या नावाखाली, लठ्ठ पगाराची नोकरी देण्याचे आमिष दाखवून लुबाडणे सुरू केले. आता लिंक पाठवून आॅनलाइन लुटमार सुरू केली आहे.१७ हजारांची अॅक्टिव्हा १ लाख, २० हजारांत !- एमआयडीसीतील एक विद्यार्थी अॅक्टिव्हा दुचाकी ओएलएक्सवर बघतो. दुसरीकडे अंबाझरीतील एक डॉक्टरही तीच अॅक्टिव्हा ओएलएक्सवर बघतो. दोघेही नमूद क्रमांकावर संपर्क साधून किंमत विचारतात. एकासोबत १७ तर, दुसºयासोबत २० हजारांत अॅक्टिव्हाचा सौदा पक्का होतो. अॅक्टिव्हामालक स्वत:ला आर्मी आॅफिसर असल्याचे सांगून एअरपोर्टवर कार्यरत असल्याचेही सांगतो. आपले बनावट ओळखपत्रही पाठवतो. दुचाकी घेण्यासाठी आधी २ हजार, नंतर ५ हजार, नंतर साडेआठ हजार, अशी रक्कम त्याच्या खात्यात जमा करायला भाग पाडतो. वेगवेगळी थाप मारून विद्यार्थी ८४ हजार जमा करतो तर डॉक्टर १ लाख २० हजार रुपये जमा करतो.मात्र, दोघांपैकी कुणालाही ती दुचाकी मिळत नाही. उलट आणखी रक्कम भरा, असे सायबर गुन्हेगार सांगत असतो. विशेष म्हणजे, जुन्या अॅक्टिव्हाला खरेदी करण्यासाठी आपण कारची रक्कम भरली हे या दोघांच्याही लक्षात येत नाही अन् जेव्हा ते लक्षात येते तोवर वेळ निघून गेलेली असते.गुगल पे अन् फसवा अॅडव्हान्ससायबर गुन्हेगार वस्तू विकत घ्यायची आहे, तुमचा गुगल पे नंबर पाठवा, असे म्हणतात. तो त्यांना मिळताच ते संबंधिताच्या मोबाइलवर एक लिंक पाठवतात. ती डाऊनलोड केल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या खात्यातून हजारोंची रक्कम काढून घेतात. आधी तहसील आणि आता सदर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.उपग्रहासारखी नजर !सायबर गुन्हेगार तुमच्यावर उपग्रहासारखे नजर ठेवून असतात. तुमचा मेल आयडी किंवा संपर्क क्रमांक मिळाल्यास त्यावर ते मेसेज पाठवितात. तो मेसेज नोकरी (नियुक्ती), खरेदी-विक्री, कर्ज मिळवून देणे, तुमचे आॅनलाइन तिकीट (विमान असो की ट्रॅव्हल्सचे) काढून देणे.तुम्हाला वाहन खरेदी करायचे असेल किंवा अजून असेच कोणतेही काम करून देण्याच्या नावाखाली ते तुम्हालाएक लिंक पाठवितात. ती डाउनलोड करा अन् त्यावर आपली माहिती नमूद करा, असे सांगतात. आम्ही त्यांची लिंक डाऊनलोड केली आणि आपली माहिती त्यात नमूदकेली की आमचे बँक खाते काही क्षणातच ते रिकामे करू शकतात. नागपुरात अशा अनेक घटना घडल्या असून, तसे गुन्हेही दाखल झाले आहेत.खात्यात ५ रुपये भरा !सायबर गुन्हेगार तुम्हाला एखादी बँक खात्याचा नंबर पाठवून त्यात रजिस्ट्रेशनफी म्हणून केवळ १ रुपया, ५ रुपये आॅनलाइन ट्रान्सफर करायला लावतात. पाच रुपयांनी आपल्याला काय फरक पडेल, असा विचार करून संबंधित व्यक्ती ते ट्रान्सफर करतो अन्स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेतो. या पाच रुपयांसोबत आमच्या बँक खात्याचे डिटेल्सही नकळत आम्ही सायबर गुन्हेगाराला पाठविले असतात. त्यामुळे तो आपल्या खात्यातून शक्य होईल तेवढी रक्कम काढून घेतो.सतर्कता हाच सर्वोत्तम उपाय : डॉ. नीलेश भरणेनागपुरात आॅनलाइन फसवणुकीचे अवघ्या ३ वर्षांत ३,०२३ गुन्हे घडले आहेत. त्यातील २९५ तक्रारी ओएलएक्ससारख्या आॅनलाइन खरेदी-विक्री पोर्टलच्या माध्यमातून झाल्याच्या आहेत. त्यामुळे कोणताही आॅनलाइन व्यवहार करताना सतर्कता बाळगणे हाच सर्वोत्तम उपाय असल्याचे मत गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. नीलेश भरणे सांगतात. सायबर गुन्हेगार नवनव्या शक्कल लढवतात. ज्याच्यासोबत आपला प्रत्यक्ष संपर्क नाही, त्याला न बघताच आपण त्याने सांगितलेल्याखात्यात रक्कम जमा करणे, हे योग्य नाही. कोणताही व्यवहार समोरासमोर करावा,असेही डॉ. भरणे यांनी सूचविले आहे.
Coronavirus : कोणतीही लिंक नका करू डाउनलोड, ही तर सायबर गुन्हेगाराची शक्कल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 4:19 AM