नागपूर - देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघ स्वयंसेवक आणि नागरिकांना कोरोनाविरोधात लढण्यासाठी आवाहन केले आहे. कोरोनाविरोधातील ही लढाई आपल्याला घरात बसूनच जिंकावी लागणार आहे. त्यासाठी लॉकडाऊन आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन करा, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे.
सध्याच्या घडीला कार्यक्रम करणे हे आपले काम नाही. तर आपले काम हाच कार्यक्रम आहे. सेवा करण्याचे काम आज बदलले आहे. सध्याच्या घडीला घरीच राहा आणि ईश्वराची प्रार्थना करा. संपूर्ण जग कोरोनाशी लढत आहे. तसेच कोरोनाविरोधात घरात राहुनच जिंकता येईल, असे त्यांनी सांगितले.
हा समाज आपला आहे. हा देश आपला आहे. त्यामुळे काहीजण काम करत आहेत. काही गोष्टी सर्वांसाठी स्पष्ट झालेल्या नाहीत. हा नवा आजार आहे. त्यामुळे याबाबत अधिकची माहिती कुणाकडे नाही. अशा परिस्थितीत आवश्यक ती परवानगी घेऊन, खबरदारी घेऊन काम करा. आपण थकता कामा नये, प्रयत्न करत राहिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी स्वयंसेवकांना केले.दरम्यान, देशातील कोरोनाच्या फैलावाचा वेग गेल्या काही दिवसात चिंताजनक पातळीपर्यंत वाढला आहे. आरोग्य मंत्रालयाने रविवारी सकाळी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 1990 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होऊन ती 26 हजार 496 पर्यंत पोहोचली आहे. तर या 24 तासात देशभरात कोरोनामुळे 49 जणांचा मृत्यू आला आहे. तर याच काळात 741 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत देशात 5 हजार 804 कोरोनाबाधित पूर्णपणे बरे झाले आहेत.