नागपूर : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज गुरुवारी शहरातील काही भागात फिरून परिस्थितीचा धावता आढावा घेतला. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर नागपुरात काय स्थिती आहे, ते बघण्यासाठी गृहमंत्री देशमुख यांनी विविध ठिकाणची पाहणी केली. त्यांच्या सोबत पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय आणि इतर वरिष्ठ अधिकारी होते.
ते सायंकाळी ५.१५ च्या सुमारास मेयो हॉस्पिटल चौकात पोहोचले. तेथे त्यांनी परिसराची पाहणी केली यावेळी एक ऑटो आणि त्यामध्ये काही लोक जाताना त्यांना दिसले. ही मंडळी कोरोनाच्या संदर्भाने जनजागृती करीत होती. त्यांच्याशी गृहमंत्र्यांनी संवाद साधला. पोलिसांनी आम्हाला या भागात कोविड योद्धा म्हणून नियुक्त केले असून त्यामुळे आम्ही सामाजिक कार्य म्हणून दिवसभर जनजागरण करतो. नागरिकांना कोरोनाच्या प्रादुर्भावाचा धोका समजावून सांगतो आणि त्यांनी घराबाहेर निघू नये म्हणून सूचना देतो, असे या कोविड योद्ध्यांनी गृहमंत्र्यांना सांगितले. यानंतर गृहमंत्र्याच्या ताफा सतरंजीपुरा तसेच मोमीनपुरा भागात पोहोचला. येथील तसेच अन्य ठिकाणच्या नाकेबंदीची गृहमंत्र्यांनी पाहणी केली.पोलिसांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था कशी तेसुद्धा पोलिस आयुक्तंकडूनजाणून घेतले. त्यानंतर या भागातील कायदा व सुव्यवस्थेची त्यांनी माहिती घेतली. यावेळी पोलीस उपायुक्त, राहुल माकणीकर यांनी त्यांना परिमंडळ तीन मधील स्थितीची माहिती दिली. गृहमंत्री आणि पोलिस आयुक्त नंतर मानेवाडा भागात पोहचले. या भागातील त्यांनी पाहणी करून परिस्थितीची माहिती जाणून घेतली.