लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरात कोरोना विषाणूचा एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला असल्याने, उपाययोजना व नियंत्रणासाठी संपूर्ण प्रशासन मिशन मोडवर कामाला लागले आहे. याअंतर्गत १५ फेब्रुवारीनंतर जे प्रवासी चीन, इटली, फ्रान्स, स्पेन, जर्मनी, साऊथ कोरिया आणि इराण या देशातून आले असतील अशा प्रवाशांना शोधून त्यांची कोरोना तपासणी करण्यात येणार आहे. या रुग्णांना १४ दिवसापर्यंत डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवणे आवश्यक आहे. अशा रुग्णांना स्वतंत्र ठेवण्यासाठी रेल्वे रुग्णालयासह आमदार निवासात व्यवस्था करण्यात येणार आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मनपा आयुक्त तुकाराम मुंढे, जि.प.चे सीईओ संजय यादव, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया आदी उपस्थित होते.विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले की, कोरोना विषाणूबाबत प्रशासनाच्या स्तरावर आवश्यक ती काळजी घेतली जात आहे. परंतु स्वत:ची काळजी घेणे हाच यावर सर्वात चांगला उपाय आहे. विदेशातून जे आले असतील आणि त्यांना खोकला किंवा ताप असेल त्यांनी स्वत:हून तपासणी करून घ्यावी. उपरोक्त सात देशातून जे प्रवासी १५ फेब्रुवारीनंतर आले त्यांचा शोध घेणे सुरू आहे. अशा सर्व प्रवाशांची कोरोना तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी ‘कॉरन टाईन’ विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. अशा प्रवाशांना किमान १४ दिवस देखरेखीत ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे ही व्यवस्था आमदार निवासात करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.१५० आयसोलेशन खाटांची व्यवस्थाकोरोना विषाणू रुग्णांसाठी नागपुरात विविध रुग्णालयांमध्ये एकूण आयसोलेशनच्या १५० खाटांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मेयो, मेडिकलसह विविध रुग्णालयांचा समावेश आहे. सहा खासगी रुग्णालयांनीसुद्धा यासाठी पुढाकार घेतला आहे.विमानतळावर आतापर्यंत ६०४ प्रवाशांची ‘थर्मल स्क्रीनिंग’कोरोना विषाणूसंदर्भात उपाययोजना म्हणून नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर विदेशातून येणाऱ्या प्रवाशांच्या तपासणीची व्यवस्था करण्यात आली आहे. याअंतर्गत प्रत्येक प्रवाशाकडून एक फॉर्म भरून घेतला जातो. त्यात त्यांना ताप, खोकला आहे का याची माहिती विचारली जाते. त्यांची थर्मल स्क्रीनिंग केली जाते. गेल्या ५ मार्चपासून ही स्क्रीनिंग सुरू करण्यात आली असून, आतापर्यंत ६०४ प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग करण्यात आली आहे. यापैकी एकही संशयित आढळून आलेला नाही. या प्रवाशांपैकी काहींना नंतर काही दिवसांनी लक्षणे आढळून आल्याने, त्यांनी रुग्णालयात स्वत: जाऊन तपासणी करून घेतल्याचेही यावेळी सांगण्यात आले.मॉल, थिएटरला आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचनाशक्यतोवर गर्दीच्या ठिकाणी जाणे लोकांनी टाळावे. मॉल आणि थिएटर संचालकांना त्यांच्या प्रतिष्ठानांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग होणार नाही, यादृष्टीने उपायायोजना कराव्यात, अशी सूचना देण्यात आल्या असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.मेडिकलने बोलावली प्रोटेक्शन किटमेडिकलमध्ये सध्या कोरोना संशयित किंवा पॉझिटिव्ह रुग्णावर उपचार करणाऱ्यासाठी विशेष प्रोटेक्शन किट आहेत. त्याची मागणी मेडिकलने केली असून, ती सायंकाळपर्यंत उपलब्ध होणार आहे. सध्या डॉक्टर ज्या प्रोटेक्शन किटचा वापर करून उपचार करीत आहेत, ती किटसुद्धा सुरक्षेच्या दृष्टीने योग्य असल्याचे मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. मित्रा यांनी यावेळी सांगितले.दररोज सायंकाळी ६ वाजता बुलेटिनकोरोनासंदर्भात दररोजचे अपडेट प्रसारमाध्यमांना देण्यासाठी दरदिवशी सायंकाळी ६ वाजता बुलेटिन (प्रेसनोट) इश्यू केली जाईल, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्षकोरोना विषाणूसंदर्भात माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. त्याचा दूरध्वनी क्रमांक ०७१२-२५६२६६८ असा आहे. जी कुणी व्यक्ती विदेशातून आली असेल आणि ज्यांना ताप व खोकला किंवा आपल्यालाही या विषाणूची लागण झाल्याचा संशय असेल, त्यांनी स्वत: तपासणी करून घ्यावी किंवा या क्रमांकावर फोन करून त्याची सूचना द्यावी. त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले जाईल.
Coronavirus in Maharashtra : १५ फेब्रुवारीनंतर त्या सात देशातून आलेल्या प्रवाशांची तपासणी अनिवार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 8:16 PM
१५ फेब्रुवारीनंतर जे प्रवासी चीन, इटली, फ्रान्स, स्पेन, जर्मनी, साऊथ कोरिया आणि इराण या देशातून आले असतील अशा प्रवाशांना शोधून त्यांची कोरोना तपासणी करण्यात येणार आहे.
ठळक मुद्देप्रशासन मिशन मोडवर : चीन, इटली, फ्रान्स, स्पेन, जर्मनी, साऊथ कोरिया, इराण या देशातील प्रवाशांचा समावेश१४ दिवस देखरेखीत ठेवणार, आमदार निवासात करणार व्यवस्था