लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एकाच कुटुंबातील चार व त्यांच्याकडे काम करणाऱ्या एक अशा पाच रुग्णांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे शुक्रवारी सामोर येताच पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली. महानगरपालिकेच्या पथकाने संबंधित वसाहतीमध्ये जाऊन घराघरांना भेटी दिल्या. यात बाधित रुग्णांच्या कुटुंबासह मित्र, शेजारी, उपचार करणारे डॉक्टर असे १४ संशयितांना मेयोत दाखल केले. यात डॉक्टरसह १० संशयितांचे नमुने निगेटिव्ह आले. रात्री उशिरापर्यंत आणखी १२वर नमुन्यांची भर पडल्याचे समजते. दिल्ली प्रवासाची पार्श्वभूमी असलेल्या ४२ वर्षीय पुरुषाचे नमुने गुरुवारी पॉझिटिव्ह आले. यामुळे त्याच दिवशी त्यांच्या कुटुंबाचे व त्यांच्या दुकानात व्यवस्थापकाचे काम करणाऱ्या व्यक्तीचे नमुने घेऊन तपासण्यात आले. याचा अहवाल शुक्रवारी पहाटे आला. यात बाधित रुग्णाची आई, पत्नी, मुलगा व व्यवस्थापकाला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे निदान झाले. यामुळे महानगरपालिका सतर्क झाली. रुग्णांकडून संपर्कात आलेल्याची माहिती घेण्यात आली. सुत्रानुसार, यात व्यवस्थापकाच्या घरातील नऊ सदस्यांचा समावेश आहे. या शिवाय, दुकानातील काही कर्मचारी, शेजारी व मित्र असे एकूण सुमारे १४ लोकांना मेयोच्या वॉर्ड क्र.४ मध्ये दाखल केले. त्यांचे नमुने घेऊन मेयोच्याच प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. यात दुकानात काम करणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांपैकी दोघांचे नमुन्यासह इतर सात संशयितांचे नमुने निगेटिव्ह आले. उर्वरीत चार व रात्री उशिरापर्यंत आणखी काही नमुन्यांची भर पडली. याचा अहवाल शनिवारी सकाळी येण्याची शक्यता आहे. दरम्यान महानगरपालिकेच्यावतीने बाधित कुटुंबाचे घर सील केले आहे. या शिवाय, परिसरात मनपाने फवारणी करून आवश्यक उपाययोजना केल्यात - डॉक्टरही धोक्यात आले होते. पॉझिटिव्ह येण्यापूर्वी संबंधित रुग्णाने सर्दी, खोकला व तापासाठी एका खासगी डॉक्टरांकडून औषधोपचार केला. गुरुवारी संबंधित रुग्ण पॉझिटिव्ह आल्याचे कळताच डॉक्टरांनी मेयो गाठून नमुने दिले. डॉक्टरांना हलका खोकला व सर्दीची लक्षणे असल्याने तेही धोक्यात आले होते. परंतु नमुन्याचा अहवाल निगेटिव्ह येताच त्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.मेडिकलमध्ये १८ संशयित रुग्णमेडिकलमध्ये वॉर्ड क्र. २५ मध्ये कोरोना विषाणू संशयित १६ रुग्ण दाखल करण्यात आले. यात १३ पुरुष व तीन महिलांचा समावेश आहे. तर इतर वॉर्डात दोन संशयित रुग्ण भरती आहेत. असे एकूण १८ रुग्ण मेडिकलमध्ये आहेत. यांच्या नमुन्याचा अहवाल प्रतीक्षेत होता. एम्समधील एक डॉक्टर संशयितअखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमधील (एम्स) एक महिला डॉक्टरकोरोना संशयित असल्याची चर्चा सुरू आहे. याची गंभीर दखल एम्सच्या संचालिका मेजर जनरल डॉ. विभा दत्ता यांनी घेतली. त्यांनी खबरदारी म्हणून नमुने तपासण्याचा सूचना केल्या आहेत. नमुने निगेटिव्ह आल्यावरच त्यांना ‘एम्स’मध्ये प्रवेश दिला जाईल. डॉ. दत्ता यांनी कोरोनाविषयीच्या अफवा पसरवू नये, असे आवाहनही केले आहे.