लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील दोन आठवड्यांपासून कोरोना रुग्णसंख्येत कमालीची वाढ झाल्याने प्रशासनाने आज शनिवार सुटीचा दिवस असतानाही नमुने तपासणीचा उच्चांक गाठला. पाच महिन्यांनंतर पहिल्यांदाच ९४४३ चाचण्या झाल्या. यात ७२५ बाधितांची नोंद झाली. पॉझिटिव्हीटीचे हे प्रमाण ७.६७ टक्क्यांवर गेले. रुग्णांची एकूण संख्या १,४२,५०७ झाली असून ६ रुग्णांच्या मृत्यूने मृतांची संख्या ४२६७ वर पोहोचली. विशेष म्हणजे आज ५०२ रुग्ण कोरोनामुक्त झाले.
सप्टेंबर महिन्यात कोरोनाबाधितांनी उच्चांक गाठला होता. याच महिन्यात ९ हजारांवर चाचण्यांची संख्या गेली होती; परंतु त्यानंतर ऑक्टोबर ते जानेवारीत चाचण्यांची संख्या ६ हजारांपुढे सरकलीच नाही. मागील आठवड्यात केंद्रीय आरोग्य पथकाने नागपूर जिल्ह्याच्या घेतलेल्या आढाव्यात ‘ट्रेसिंग’ व ‘टेस्टिंग’बाबत अधिकाऱ्यांचे कान टोचले होते. परिणामी, १६ फेब्रुवारीपासून चाचण्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले. आज एकूण चाचण्यांमध्ये ६५९० आरटीपीसीआर व २५८३ रॅपिड अँटिजेन चाचण्या झाल्या. यात आरटीपीसीआरमध्ये ६८९, तर अँटिजेनमधून ३६ बाधित आढळून आले.
शहरात ५८५, ग्रामीणमध्ये १३७ रुग्ण
शुक्रवारच्या तुलनेत आज रुग्ण व मृतांच्या संख्येत घट आली. नव्या रुग्णांमध्ये शहरातील ५८५, ग्रामीणमधील १३७, तर जिल्ह्याबाहेरील ३ रुग्णांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, आज ग्रामीणमध्ये शून्य मृत्यूची नोंद झाली. शहरात व जिल्ह्याबाहेरील प्रत्येकी ३ रुग्णांचे मृत्यू झाले. शहरात रुग्णांची एकूण संख्या १,१३,६७७ व २७६३ मृत्यू, तर ग्रामीणमध्ये २७,९०७ रुग्ण व ७६३ मृत्यू झाले आहेत.
खासगीमध्ये सर्वाधिक तपासले नमुने
सहा शासकीय प्रयोगशाळेच्या तुलनेत आज कोरोनाचे सर्वाधिक ३९३६ नमुने खासगी लॅबमध्ये तपासण्यात आले. यात २३८ बाधितांची नोंद झाली. मेयोच्या प्रयोगशाळेत ११४८ नमुन्यांतून १४४, मेडिकलच्या प्रयोगशाळेत ५५१ नमुन्यांतून १३९, एम्सच्या प्रयोगशाळेत ४४५ नमुन्यांतून ९१, नीरीच्या प्रयोगशाळेत २१२ नमुन्यांतून ४२, तर नागपूर विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत २९८ नमुन्यांतून ३५ रुग्ण पॉझिटिव्ह आले.