लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनकडे दुर्लक्ष करून लकडगंज पोलीस ठाण्यांतर्गत सील केलेल्या सतरंजीपुऱ्यातील मारवाडी चौकात सुपारीचा कारखाना सुरु होता. गुन्हे शाखेला माहिती मिळताच या कारखान्यावर धाड टाकून कारखान्याच्या संचालकासह चार कामगारांना रंगेहात पकडण्यात आले. यामुळे लकडगंज पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह लागले आहे.सैय्यद सज्जाद अली मुजफ्फर अली (४७) रा. महेशनगर, शांतीनगर असे या सुपारी कारखान्याच्या मालकाचे नाव आहे. लॉकडाऊनमुळे सुपारीचा तुटवडा आहे. तरीसुद्धा लपुनछपुन खर्रा, गुटख्याची विक्री सुरु आहे. यामुळे सुपारीची मागणी वाढली असून सुपारीचाही काळाबाजार होत आहे. याबाबत ‘लोकमत’ने यापुर्वीही वृत्त प्रकाशित केले होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सज्जाद अली लॉकडाऊन असतानाही खुलेआमपणे सुपारीचा कारखाना चालवित होता. परिसरातील नागरिकांनी लकडगंज पोलिसांना याबाबत माहिती दिली. परंतु त्यानंतरही लकडगंज पोलिसांनी कारवाई न केल्यामुळे नागरिकांनी गुन्हे शाखेला माहिती दिली. गुन्हे शाखेने गुरुवारी सायंकाळी सज्जादचा कारखाना ताज इंडस्ट्रीजवर धाड टाकली. सज्जाद चार कामगारांच्या मदतीने कारखाना चालविताना आढळला. कारखान्यात लाखो रुपयांची सुपारी ठेवलेली होती. अन्न व औषध प्रशासनानेही सुपारीचे नमुने घेतले आहेत. सज्जाद विरुद्ध लकडगंज ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा कारखाना दाट लोकवस्तीत आहे. कोरोनाच्या रुग्णाचा मृत्यू आणि अनेक नागरिकांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे सतरंजीपुरा सील करण्यात आला आहे. येथे नेहमीच पोलीस तैनात असतात. लकडगंज पोलिसांना परिसरात गस्त घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तरीसुद्धा खुलेआमपणे हा सुपारीचा कारखाना सुरु असूनही लकडगंज पोलिसांना याबाबत कशी माहिती मिळाली नाही, हा प्रश्न आहे. लॉकडाऊन दरम्यान ‘भोपाली’ हा सुपारी तस्करी करीत आहे. तो सज्जाद अलीसह अनेक कारखान्यांच्या संचालकांना सुपारीचा पुरवठा करीत आहे. भोपालीला पोलीस, केंद्र शासनाच्या एजन्सी आणि एफडीएचा आश्रय आहे. लकडगंज ठाण्याच्या परिसरात भोपालीचे अनेक अड्डे आहेत. ही कारवाई पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विनोद चौधरी, चंद्रशेखर मस्के, सहायक पोलीस निरीक्षक योगेश चौधरी, रफीक खान, हवालदार रामचंद्र कारेमोरे, प्रशांत लांडे, शैलेश पाटील, टप्पुलाल चुटे, प्रविण गोरटे, श्याम कडु, शरीफ सत्यम, एफडीएचे अधिकारी एम. डी. तिवारी आणि त्यांच्या पथकाने केली.
CoronaVirus in Nagpur : सील केलेल्या वस्तीत सुरु होता सुपारीचा कारखाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 9:26 PM
लॉकडाऊनकडे दुर्लक्ष करून लकडगंज पोलीस ठाण्यांतर्गत सील केलेल्या सतरंजीपुऱ्यातील मारवाडी चौकात सुपारीचा कारखाना सुरु होता. गुन्हे शाखेला माहिती मिळताच या कारखान्यावर धाड टाकून कारखान्याच्या संचालकासह चार कामगारांना रंगेहात पकडण्यात आले.
ठळक मुद्देपोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह : सतरंजीपुऱ्यात गुन्हे शाखेची कारवाई