लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सोमवारी कोरोना संशयित रुग्णाचा मृत्यू होताच खळबळ उडाली होती. दुसऱ्याच दिवशी नमुने निगेटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला. परंतु बुधवारी नमुन्याचा अहवाल येण्यापूर्वीच आणखी एका संशयित रुग्णाचा मृत्यू झाल्याने तणाव वाढला आहे. नागपूरच्या मेयोमध्ये आज पहिल्या टप्प्यात ९९ नमुने तपासण्यात आले. यातील एक बुलडाण्याचा नमुना पॉझिटिव्ह आला असून उर्वरित ९८ नमुने निगेटिव्ह आले आहेत. नागपुरात कोरोनाबाधित पहिल्या रुग्णाची नोंद ११ मार्च रोजी झाली. अमेरिका पार्श्वभूमी असलेल्या या रुग्णाकडून त्याची पत्नी, त्याच्यासोबत अमेरिकेला प्रवासाला असलेले त्याचे दोन सहकाऱ्यांचेही नमुने बाधित आले. परंतु त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांचे नमुने निगेटिव्ह आले. यामुळे पहिली साखळी येथेच खंडित झाली. त्यानंतर तब्बल १६ दिवसांनंतर दुसरा बाधित रुग्ण आढळून आला. या रुग्णाची दिल्ली प्रवासाची पार्श्वभूमी होती. या रुग्णाकडून त्याची आई, पत्नी, मुलगा, त्याच्या दुकानातील व्यवस्थापक, व्यवस्थापकाची मुलगी, दुकानातील कर्मचारी, बाधित रुग्णाचा भाऊ, त्याची पत्नी आणि मुलगा असे एकूण ११ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांचे नमुने तपासण्यात आले असता सर्व निगेटिव्ह आले. ३० मार्च रोजी आणखी एक रुग्ण पॉझिटिव्ह आला. याच्या संपर्कात आलेले ३४ नमुने तपासण्यात आले असता सर्व नमुने निगेटिव्ह आले. यामुळे लागण झालेल्याची साखळी खंडित झाल्याचे बोलले जात आहे. नागपुरात आतापर्यंत १६ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून चार रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सध्याच्या स्थितीत मेयोमध्ये नऊ तर मेडिकलमध्ये तीन असे एकूण १२ रुग्ण उपचाराला आहेत. मेडिकलमध्ये दिवसभरात ३० तर मेयोमध्ये ३५ कोरोना संशयित रुग्ण दाखल झाले आहेत. आतार्यंत संशयित रुग्णांचा आकडा ९४३ वर गेला आहे. आमदार निवासाच्या विलगीकरण कक्षात आज १०२ नव्या संशयितांची भर पडली आहे. सध्या या कक्षात ३३७ संशयित आहेत. नागपुरात ‘होम क्वारंटाइन’ केलेले १२१५ संशयित आहेत.
CoronaVirus in Nagpur : १६ बाधित रुग्णांनंतर लागणची साखळी खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2020 12:22 AM
नागपूरच्या मेयोमध्ये आज पहिल्या टप्प्यात ९९ नमुने तपासण्यात आले. यातील एक बुलडाण्याचा नमुना पॉझिटिव्ह आला असून उर्वरित ९८ नमुने निगेटिव्ह आले आहेत.
ठळक मुद्देआणखी एका संशयिताचा मृत्यू : ९८ नमुने निगेटिव्ह