सुमेध वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका विदर्भातील आदिवासीबहुल जिल्ह्यांना बसला आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्येसोबतच मृत्यूची संख्या तीन ते पाच पटीने वाढली. अमरावती जिल्ह्यात पहिल्या लाटेत ३९६, दुसऱ्या लाटेत ९९४, गडचिरोली जिल्ह्यात पहिल्या लाटेत १०२, दुसऱ्या लाटेत ६०२, गोंदिया जिल्ह्यात पहिल्या लाटेत १९८, दुसऱ्या लाटेत ४८२ तर, चंद्रपूर जिल्ह्यात पहिल्या लाटेत १९८ व दुसऱ्या लाटेत ४८२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. विशेष म्हणजे, अमरावती जिल्हा वगळता इतर तीन जिल्ह्यात मृत्यूदरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत नागरिकांमध्ये प्रचंड दहशत होती. मात्र मृत्यूचे प्रमाण कमी होते. कोरोनाचा पहिला रुग्ण मार्च २०२० मध्ये आढळून आला. सात महिन्यानंतर म्हणजे ऑक्टोबर २०२० दरम्यान रुग्ण कमी व्हायला लागले. मात्र फेब्रुवारी २०२१ पासून पुन्हा रुग्ण वाढायला लागले. ही दुसरी लाट असल्याचे शासनाने मार्च महिन्यात घोषणा केली. एप्रिल महिन्यात रुग्ण व मृत्यूच्या संख्येने जुने सर्व विक्रम मोडित निघाले. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सर्वच जिल्ह्यात दुसरी लाट ओसरताना दिसून येत आहे. परंतु दुसऱ्या लाटेत कोरोनाबाधितांसोबतच मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.
- अमरावती जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत १.१३ टक्के मृत्यू
अमरावती जिल्ह्यात एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत १९,०६८ रुग्ण आढळून आले तर, ३९६ रुग्णांचे जीव गेले. मृत्यूचा दर २.०७ टक्के एवढा होता. दुसऱ्या लाटेत म्हणजे जानेवारी ते २५ मे २०२१ पर्यंत ७०,४७९ रुग्णांची नोंद झाली असताना, ९९४ रुग्णांचे मृत्यू झाले. पहिल्या लाटेच्या तुलनेत जवळपास तिपटीने मृत्यूची संख्या वाढली. मात्र, मृत्यूचे प्रमाण कमी असून, ते १.१३ टक्के आहे.
- गडचिरोली जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत ३ टक्के मृत्यू
गडचिरोली जिल्ह्यात पहिल्या लाटेत ९,०२० रुग्ण व १०२ मृत्यूची नोंद झाली. मृत्यूचा दर १.१३ टक्के होता. दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्येत १० हजाराने वाढ होऊन १९,९६९ तर, मृत्यूची संख्या पाच पटीने वाढून ६०२ झाली. मृत्यूचा दर वाढून ३.०१ टक्क्यांवर गेला. येथील जिल्हा शल्य चिकित्सकानुसार जवळपास १५ टक्क्याहून अधिक मृत्यू हे जिल्हाबाहेरील आहेत.
- गोंदिया जिल्ह्यात १.८१ टक्के मृत्यू
गोंदिया जिल्ह्यात पहिल्या लाटेत १३,७३० रुग्ण आढळून आले व १९८ रुग्णांचे बळी गेले. मृत्यूदर १.४४ टक्के होता. दुसऱ्या लाटेत दुपटीने रुग्ण वाढून रुग्णांची संख्या २६,५४० वर पोहचली, तर ४८२ मृत्यूची नोंद झाली. मृत्यूचे प्रमाण वाढून १.८१ टक्क्यावर पोहचले आहे.
- चंद्रपूर जिल्ह्यात १.७४ टक्के मृत्यू
चंद्रपूर जिल्ह्यात पहिल्या लाटेत २२,३०८ रुग्ण व ३६६ मृत्यू झाले. मृत्यूदर १.६४ टक्के होता. परंतु दुसऱ्या लाटेत जवळपास चार पटीने रुग्ण व सहा पटीने मृत्यू वाढले. ५९,२०४ रुग्ण व १,०३३ मृत्यूची नोंद झाली. मृत्यूदरही वाढून तो १.७४ टक्के झाला आहे.