लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यात कोरोना आटोक्यात येऊ लागल्याचे चित्र आहे. सप्टेंबर महिन्यात रुग्ण व मृतांच्या संख्येने उच्चांक गाठला होता. परंतु ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून दोन्ही रुग्णसंख्येत घट दिसून येत आहे. पहिल्या आठवड्यात ५,२४६ रुग्ण व १७१ मृतांची नोंद झाली. मागील आठवड्यात ३,६७१ व १४५ मृत्यू तर या आठवड्यात ३,१२३ रुग्ण १२१ रुग्णांचे मृत्यू झाले. पहिल्या आठवड्याच्या तुलनेत २,१२३ रुग्णांची व ५० मृत्यू कमी झाले आहेत. आज ३६९ रुग्ण व १९ मृत्यूची भर पडली. एकूण रुग्णसंख्या ९३,४२४ तर मृतांची संख्या ३,०४६ वर पोहचली.
सण-उत्सवाच्या तोंडावर रुग्णसंख्या कमी झाली आहे. परिणामी, कोरोनाची भीतीही ओसरू लागली आहे. परंतु कोरोना संपलेला नाही, खबरदारी न घेतल्यास या आजाराची लागण होऊ शकते. यामुळे मास्क घालणे, सॅनिटायझेशनचा वापर करणे व फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे महत्त्वाचे असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. आज ३,४२३ आरटीपीसीआर तर २,६३७ रॅपिड अँटिजन अशा एकूण ६,०६० रुग्णांच्या चाचण्या झाल्या. नव्या रुग्णांच्या तुलनेत अधिक, ४६९ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत ८४,७८५ रुग्ण बरे झाले असून, हे प्रमाण ९०.७५ टक्क्यांवर गेले आहे.
१०४ रुग्णालयांत केवळ १६११ रुग्ण भरती
मेयो, मेडिकल व एम्स या शासकीय रुग्णालयांसह ८० विविध खासगी रुग्णालये आणि ३१ कोविड केअर सेंटर असे मिळून १०४ रुग्णालयात सद्यस्थितीत केवळ १६११ रुग्ण भरती आहेत. ३,९८२ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. ३१ सप्टेंबर रोजी या सर्व रुग्णालयात ४,५५७ रुग्ण भरती होते, तर होम आयसोलेशनमध्ये ८,४७८ रुग्ण होते.
५,६९१ चाचण्या निगेटिव्ह
आज ६,०६० चाचण्यांमधून २,४७६ रॅपिड अँटिजन तर ३,२१५ आरटीपीसीआर अशा एकूण ५,६९१ चाचण्या निगेटिव्ह आल्या. हे एक चांगले संकेत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मेडिकलमध्ये तपासण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये २५, एम्समध्ये ३१, मेयोमध्ये ४६, माफसूमध्ये १७, नागपूर विद्यापीठामध्ये २४, खासगी लॅबमध्ये ५४ रुग्ण पॉझिटिव्ह आले.
कोरोनाची आजची स्थिती
दैनिक संशयित : ६,०६०
बाधित रुग्ण : ९३,४२४
बरे झालेले : ८४,७८५
उपचार घेत असलेले रुग्ण : ५,५९३
मृत्यू : ३,०४६