लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाची लक्षणे दिसू लागताच बाधित व्यक्तीने स्वत:हून तपासणीसाठी पुढाकार घेतला. मेयोत नमुने दिल्यावर तेथेच भरतीही झाले. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह येताच कुटुंबातील इतर व्यक्तींनीही लगेच पुढाकार घेत नमुने दिले, अशी माहिती गुरुवारी पाचवा पॉििझटव्ह ठरलेल्या रुग्णाच्या काकाने लोकमतला दिली.काकांनी लोकमतशी बोलताना बाधित व्यक्तीचा १६ मार्चपासूनचा एकूणच प्रवास सांगितला. ते म्हणाले, बाधित रुग्ण त्याच्या मॅनेजरसोबत १६ मार्च रोजी तामिळनाडू एक्स्प्रेसने दिल्लीला गेला. १७ मार्च रोजी सकाळी ते दिल्लीत पोहचले. तेथे करोलबाग परिसरातील दोन प्रतिष्ठानांमध्ये जाऊन त्यांनी जोडे, चप्पल खरेदीची आॅर्डर दिली. त्याच दिवशी रात्री तेलंगणा एक्स्प्रेसने (कोच एस ४, बर्थ ३८, ४०) ते परत निघाले. १८ मार्चला ते नागपुरात पोहचले. १८, १९ व २० मार्च असे तीन दिवस त्यांना काहीच जाणवले नाही. २२ मार्च रोजी रविवारी जनता कर्फ्यू होता. त्यामुळे ते घरीच होते. २४ मार्च रोजी रात्री त्यांना ताप, सर्दी, खोकला जाणवू लागला. त्यामुळे त्यांनी आपल्याला रात्री (काका) फोन केला. आपण त्यांना लगेच तपासणी करून घेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार पुतण्याने २५ मे रोजी दुपारी ३.३० वाजता मेयो इस्पितळ गाठले. त्यांचे सॅम्पल घेण्यात आले व मेयोच्या वॉर्डात भरती करण्यात आले. रिपोर्ट येण्यास बराच वेळ लागला. त्यामुळे गुरुवारी २६ मार्च रोजी सकाळी आपण एका आमदारांना फोन केला व मेयोच्या डीनशी बोलून रिपोर्ट लवकर मागविण्याची विनंती केली. त्यामुळे आमदारांनी डीनला फोन करून विनंती केली. तत्पूर्वी सकाळी मेयोच्या प्रयोगशाळेतील एकाने अहवाल निगेटिव्ह आल्याचे सांगितले होते. मात्र, त्यानंतर आपण स्वत: तेथे कार्यरत असलेल्या महापालिकेच्या डॉक्टरशी संपर्कसाधला असता फिप्टी-फिप्टी चान्स असल्याचे सांगण्यात आले. या संपूर्ण काळात आपला पुतण्या मेयोमध्येच भरती होता. त्या बाहेर सोडले गेले नाही किंवा कुटुंबीयांनीही तसा आग्रह धरला नाही. शेवटी गुरुवारी दुपारी रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे सांगण्यात आले व दुपारी ३ च्या सुमारास पुतण्याला आयसोलेशन वॉर्डात हलिवण्यात आले.यानंतर काही वेळातच मेयोच्या डॉक्टरांची चमू पुतण्याच्या घरी पोहचली व बाधिताची आई, पत्नी, मुलगा व मुलगी अशा चौघांना अॅम्बुलन्समध्ये बसवून मेयोमध्ये घेऊन गेले. आम्ही सर्व सुशिक्षित असल्यामुळे व याचे गांभीर्य असल्यामुळे स्वत:हून तपासणीसाठी पुढाकार घेतला. मेयोत संबंधितांचे नमुने घेतल्यावर बाधिताची आई, पत्नी व मुलगा पॉझिटव्ह आला. त्यामुळे त्यांनाही आयसोलेशन वार्डात हलविण्यात आले. मुलगी निगेटिव्ह आली. तिला शुक्रवारी दुपारी सुटी मिळाली. दिल्लीला सोबत गेलेल्या मॅनेजरचे नमुनेही पॉििझटव्ह आल्यामुळे त्यांनाही भरती करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
CoronaVirus in Nagpur : बाधित व कुटुंबीयांनी स्वत:हून तपासणीसाठी पुढाकार घेतला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 12:05 AM
कोरोनाची लक्षणे दिसू लागताच बाधित व्यक्तीने स्वत:हून तपासणीसाठी पुढाकार घेतला. मेयोत नमुने दिल्यावर तेथेच भरतीही झाले. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह येताच कुटुंबातील इतर व्यक्तींनीही लगेच पुढाकार घेत नमुने दिले,
ठळक मुद्दे बाधित रुग्णाच्या काकांची लोकमतला माहिती