लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाबाधितांच्या संख्येत घट आल्याने महामारीचा वेग मंदावल्याचे दिसून येत आहे. मागील २४ तासांत २२२४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. एप्रिल महिन्यानंतरचा हा सर्वात कमी आकडा आहे. नागपूर जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या ४,५८,६०४ झाली आहे. गुरुवारी ७७ रुग्णांचे जीव गेले. मृत्यूची संख्या ८४०२ झाली आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी १३ सप्टेंबर रोजी रुग्णसंख्येने उच्चांक गाठत २३४३ चा आकडा ओलांडला असताना हाहाकार उडाला होता. परंतु यावर्षी २४ एप्रिल रोजी ७९९९वर गेलेली रुग्णसंख्या आज दोन हजारावर आल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
नागपूर जिल्ह्यात सलग १४ दिवसांपासून कोरोनाचा प्रादूर्भाव कमी होतआहे. मात्र, त्या सोबतच चाचण्यांच्या संख्येतही मोठी घट होऊ लागली आहे. हे धोक्याचे संकेत तर नाही ना, अशी शंकाही उपस्थित केली जात आहे. १३ एप्रिल रोजी आतापर्यंतचा सर्वाधिक, २९,१२२ चाचण्या झाल्या होत्या. त्यानंतर २४ ते २५ हजार दरम्यान चाचण्या होत होत्या. परंतु २ मेपासून ही संख्या १५ ते २० हजाराच्या घरात आली आहे. गुरुवारी १५,७१४ चाचण्या झाल्या. यात १२,६५५ आरटीपीसीआर तर ३०५९ रॅपीड अँटिजेन चाचण्या होत्या. आज ५,८८४ रुग्ण बरे झाले. कोरोनामुक्त होण्याचा दर वाढला असून तो ८८ टक्क्यांवर गेला आहे. आतापर्यंत ४,१०,५८६ रुग्ण बरे झाले आहेत.
मृत्यूची संख्या कधी कमी होणार?
रुग्णसंख्येत मोठी घट दिसून येत असताना मृत्यूचे प्रमाण अद्यापही चिंता व्यक्त करणारे आहे. कोरोनाचा या १४ महिन्यांच्या काळात सर्वाधिक मृत्यूची नोंद २२ एप्रिल २०२१ रोजी झाली. ११० रुग्णांचे जीव गेले. त्यानंतर दैनंदिनी ८० ते ९० रुग्णांचे मृत्यू होत होते. मागील सात दिवसांत ही संख्या ७० ते ८० वर आली असलीतरी मृत्यूचे प्रमाण कधी कमी होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शहर आणि ग्रामीणमध्ये केवळ ११३ रुग्णांचा फरक
शहरात आज ११६३ रुग्ण व ४१ मृत्यूची नोंद झाली. तर ग्रामीण भागात १०५० रुग्ण व २५ मृत्यूची नोंद झाली. शहर आणि ग्रामीणमध्ये केवळ ११३ रुग्णांचा फरक असल्याने आश्चर्यव्यक्त केले जात आहे. शहरात रुग्णांची एकूण संख्या ३,२३,१२५ व मृतांची संख्या ५०६० झाली आहे. ग्रामीणमध्ये १,३४,०८४ रुग्ण व २१२९ मृत्यूची नोंद झाली आहे.
कोरोनाची गुरुवारची स्थिती
दैनिक चाचण्या: १५,७१४
ए. बाधित रुग्ण :४,५८,६०४
सक्रीय रुग्ण : ३९,६१६
बरे झालेले रुग्ण :४,१०,५८६
ए. मृत्यू : ८४०२