लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत कमालिची घट दिसून येत असताना नागपूर जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाचा दुसऱ्या लाटेतील सर्वात कमी रुग्ण व मृत्यूची नोंद झाली. १९० रुग्ण व ८ मृत्यू नोंदविण्यात आले. पॉझिटिव्हिटीचा दर कमी होऊन १.६७ टक्क्यांवर आला. रुग्णसंख्येसोबतच आता मृत्यूदरही नियंत्रणात आल्याने नागपूर जिल्ह्याचे ‘अनलॉक’च्या दिशेने पाऊल पडत असल्याचे सकारात्मक चित्र आहे.
डिसेंबरपासून रुग्णसंख्येत वाढ होण्यास सुरुवात झाली असली, तरी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची घोषणा फेब्रुवारी महिन्यात करण्यात आली. डिसेंबर महिन्यात ५०० ते ३०० दरम्यान रोज पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत होते. जानेवारी महिन्यातही एवढीच रुग्णसंख्या होती. केवळ २७ जानेवारी रोजी पहिल्यांदाच २००च्या खाली रुग्णसंख्या आली; परंतु आदल्या दिवशी प्रजासत्ताक दिन असल्याने कमी चाचण्या झाल्याने रुग्णसंख्या १६६ आल्याचे सांगितले जाते. त्यानंतर आज पहिल्यांदाच सर्वात कमी रुग्णांची नोंद झाली. शिवाय, ५२९ रुग्ण बरे झाले. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढून ९७. ११ टक्क्यांवर गेले आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे.
शहरात व ग्रामीणमध्ये प्रत्येकी २ मृत्यू
नागपूर जिल्ह्यात मृत्यूदरातही घट आली असून, गुरुवारी हा दर १.८७ टक्के होता. जिल्ह्यात झालेल्या एकूण ११,३५४ चाचण्यांमधून शहरात ८,२१२ चाचण्या झाल्या. यात १२१ रुग्ण पॉझिटिव्ह आले व २ रुग्णांचा मृत्यू झाला. तर ग्रामीणमध्ये ३,१४२ चाचण्यांमधून ६५ रुग्ण व २ मृत्यूची नोंद झाली. शहर आणि ग्रामीणच्या तुलनेत मात्र जिल्हाबाहेरील रुग्ण व मृत्यूची संख्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. आज पुन्हा ४ रुग्ण व तेवढ्याच संख्येत रुग्णांचे जीव गेले. धक्कादायक म्हणजे, आतापर्यंत जिल्हाबाहेरील १५६४ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून, यातील १३८२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाची गुरुवारची स्थिती
दैनिक चाचण्या: ११,३५४
शहर : १२१ रुग्ण व २ मृत्यू
ग्रामीण : ६५ रुग्ण व २ मृत्यू
एकूण बाधित रुग्ण :४,७५,२०२
एकूण सक्रिय रुग्ण : ४८१६
एकूण बरे झालेले रुग्ण : ४,६१,४५३
एकूण मृत्यू : ८,९३३