सुमेध वाघमारे
नागपूर : कोरोनाचा तिसऱ्या लाटेमध्ये सर्वाधिक लहान मुले प्रभावित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे; परंतु गरीब व सामान्य रुग्णांसाठी आधार असलेल्या मेयो, मेडिकलमधील बालरोग विभागातील ‘पीआयसीयू’ म्हणजे लहान मुलांच्या ‘आयसीयू’ची स्थिती धक्कादायक आहे. मेडिकलमध्ये केवळ ८, तर मेयोमध्ये १० खाटांचे ‘पीआयसीयू’ आहे. तज्ज्ञांच्या मते, शहरात किमान ३०० खाटांचे ‘एचडीयू’, २०० खाटांचे ‘पीआयसीयू’ तर १०० खाटांचे ‘एनआयसीयू’ची गरज आहे. याशिवाय, याला लागणारे डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांची पदे तातडीने भरणे आवश्यक आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान लहान मुले व कुमारवयीन मुलांमध्ये संसर्गाचे प्रमाण फारसे नव्हते; परंतु दुसऱ्या लाटेत १९ वर्षापर्यंतच्या वयोगटात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे दिसून आले आहे. जानेवारी महिन्यात नागपुरात ९०३, फेब्रुवारी महिन्यात १७४१, मार्च महिन्यात ६९६६; तर एप्रिल महिन्यात २०८१० अशी एकूण चार महिन्यांत ३०,४२० मुले बाधित झाली आहेत. यातच कोरोना विषाणूचे होत असलेले ‘म्युटेशन’, लसीकरणापासून दूर असलेली मुले व कोरोना प्रतिबंधक नियमांचे मुलांकडून योग्य पद्धतीने पालन होत नसल्याने कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. यामुळे आतापासूनच फार वेगाने आवश्यक वैद्यकीय सोयी उभारणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
- मेडिकलचे ४० खाटांचे पीआयसीयू कोविडच्या मोठ्या रुग्णांच्या सेवेत
मेडिकलमध्ये मागील वर्षापासून रुग्णसेवेत सुरू झालेले तीन मजल्यांच्या नवीन ‘आयसीयू’मध्ये बालरोग विभागाचे ४० खाटांचे ‘पेडियाट्रिक इन्टेन्सिव्ह केअर युनिट’ (पीआयसीयू) आहे; परंतु सध्या हे युनिट कोरोनाच्या मोठ्या रुग्णांचे ‘आयसीयू’मध्ये रूपांतरित करण्यात आले आहे. तिसऱ्या लाटेचा प्रभाव मोठ्यांवरही होणार असल्याने हे युनिट बालरोग विभागाला मिळण्याची शक्यता कमी आहे. सध्या मेडिकलमध्ये आठ खाटांचे ‘पीआयसीयू’ तर ३० खाटांचे ‘इन्टेन्सिव्ह केअर युनिट’ (एनआयसीयू) आहे.
- मेयोतील स्थिती गंभीर
मेयोमध्ये कोरोनाच्या लहान मुलांसाठी १० खाटांचे ‘पीआयसीयू,’ तर १५ खाटांचे ‘एनआयसीयू’ आहे. धक्कादायक म्हणजे, रुग्णालयात ‘पीआयसीयू’चा खाटा वाढवितो म्हटले तरी जागेची व पायाभूत सोयींची कमतरता आहे. यामुळे मेयोची स्थिती गंभीर असल्याचे चित्र आहे.
- ५० खाटांचा ‘पीआयसीयू’चा प्रस्ताव
तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन मेडिकलच्या बालरोग विभागाने अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांच्या मार्गदर्शनात ५० खाटांचा ‘पीआयसीयू’चा प्रस्ताव तयार केला आहे. याशिवाय, ४० खाटांचे ‘पीआयसीयू’ जे मोठ्या कोविड रुग्णांच्या सेवेत आहे, ते उपलब्ध झाल्यास ९० खाटा होतील.
- डॉ. दीप्ती जैन, प्रमुख, बालरोग विभाग, मेडिकल
- १० ते १२ टक्के मुले प्रभावित होण्याची शक्यता
बाधित झालेल्या मोठ्या व्यक्तींची टक्केवारी लक्षात घेता, अंदाज व्यक्त केल्या जात असलेल्या तिसऱ्या लाटेत १० ते १२ टक्के मुले बाधित होण्याची शक्यता आहे. नागपुरात विदर्भच नाही, तर आजूबाजूच्या राज्यातून रुग्ण येतात. यामुळे लहान मुलांसाठी ३०० खाटांचे ‘एचडीयू’, २०० खाटांचे ‘पीआयसीयू,’ तर १०० खाटांच्या ‘एनआयसीयू’ची आवश्यकता पडण्याची शक्यता आहे. याशिवाय ३०० खाटांच्या कोविड केअर सेंटरची गरज पडेल. याला लागणारे तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका व यंत्रसामग्री उभारावी लागणार आहे. पीडित मुलांसोबत आईवडील राहतात. त्यांच्याही राहण्याची सोय करावी लागणार आहे.
- डॉ. अभिमन्यू निसवाडे
सदस्य, टास्क फोर्स (बालरोग)