लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहराच्या तुलनेत ग्रामीणमध्ये रुग्णांची संख्या वाढत असल्याने ही चिंतेची बाब बनली आहे. गुरुवारी नागपूर जिल्ह्यात १,१५१ रुग्ण व २८ मृत्यूची नोंद झाली. यात शहरातील ५६२ रुग्ण व ९ मृत्यू, तर ग्रामीणमधील ५७८ रुग्ण व ८ मृत्यू आहेत. शहरात पॉझिटिव्हटीचा दर ४.०७ असून, ग्रामीणमध्ये १०.६३ टक्के आहे. विशेष म्हणजे, १५ मे रोजी ग्रामीणचा पॉझिटिव्हीटीचा दर ४७.३२ टक्के होता. तो कमी होत असलातरी ग्रामीणमध्ये चाचण्यांची संख्या वाढविण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
नागपूर जिल्ह्यात आज १९,२१७ चाचण्या झाल्या. यात शहरातील १३,७८१, तर ग्रामीणमधील ५,४३६ चाचण्यांचा समावेश होता. मागील काही दिवसांत शहरासोबतच ग्रामीणमध्येही रुग्णसंख्या कमी होत असलीतरी शहराच्या तुलनेत अधिक जास्त राहत आहे. दैनंदिन मृत्यूची संख्याही शहर आणि ग्रामीणमध्ये बरोबरीची असल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी शहरात ९, तर ग्रामीणमध्ये ८ मृत्यू झाले. धक्कादायक म्हणजे, याच्या तुलनेत जिल्ह्याबाहेरील ११ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. रुग्णसंख्येच्या अधिक रुग्ण बरे होण्याचे प्रमाण कायम असून, आज ३,४०५ रुग्ण बरे झाले. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचा दर ९४.०३ टक्क्यांवर गेला आहे. आतापर्यंत ४,४०,००० रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनाचा अॅक्टिव्ह रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. ७७ हजारांवर गेलेली ही रुग्णसंख्या आज १९ हजारांवर आली आहे.
अडीच महिन्यांनंतर मृत्यूसंख्येत घट
२० मार्च रोजी २९ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती. त्यानंतर जवळपास अडीच महिन्यांनंतर आज पहिल्यांदाच मृत्यूसंख्येत घट होऊन २८ झाली आहे. मागील चार महिन्यांत सर्वाधिक मृत्यूची नोंद १९ एप्रिल रोजी झाली होती. ११३ रुग्णांचे बळी गेले होते. त्यानंतर २२ तारखेला ११०, २७ तारखेला १०१, २८ तारखेला १०२, तर २ मे रोजी ११२ मृत्यूची नोंद झाली.
कोरोनाची गुरुवारची स्थिती
दैनिक चाचण्या : १९,२१७
शहर : ५६२ रुग्ण व ९ मृत्यू
ग्रामीण : ५७८ रुग्ण व ८ मृत्यू
ए. बाधित रुग्ण : ४,६७,९३१
ए. सक्रिय रुग्ण : १९,२४६
ए. बरे झालेले रुग्ण : ४,४०,०००
ए. मृत्यू : ८,६८५