प्रवीण खापरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे वाढलेल्या धास्तीत अनेक आजार जणू पळून गेले की काय, असे चित्र निर्माण झाले आहे. सर्वत्र कोरोनाची चर्चा, त्याचे दिसून येणारे दुष्परिणाम, वाढलेले मृत्यू, उपचार-औषधांचा तुटवडा यामुळे सगळेच जण खजिल झाले आहेत. मात्र, त्यात आता कोरोनापश्चात होणार्या विकारांची भर पडली आहे.
सायनसमध्ये म्युकरमायकोसिस नामक फंगस (बुरशी)चा प्रादुर्भाव होत असून, हा विकार जीवघेणा ठरत असल्याचे आढळून आले आहे. पूर्वी म्युकरमायकोसिस विकाराचे वर्षातून एखादं-दोन रुग्ण आढळत होते. मात्र, आता कोरोनापश्चात लक्षणांसह ईएनटी डॉक्टरांकडे या बुरशीच्या प्रादुर्भावाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात जात असल्याचे दिसून आले आहे. आकडेवारीनुसार हजार कोरोना रुग्णांमागे २० रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिसचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. विशेष म्हणजे, कोरोना संक्रमणानंतर या आजाराची लक्षणे दिसून येत आहेत. मात्र, कोरोनाचा प्रभाव म्हणून अनेक रुग्ण त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. अनेकदा स्थिती गंभीर झाल्यावरच रुग्ण डॉक्टरांकडे जात असल्याने रोग हाताबाहेर जात असल्याचे आढळून येत आहे. जर या रोगावर वेळीच उपचार केला नाही तर जबडा, डोळा काढण्याची वेळ येऊ शकते. मेंदूत प्रादुर्भाव झाला तर मृत्यूदेखील होऊ शकतो.
सायनस फंगस - म्युकरमायकोसिस
ज्यांना दीर्घकालिन मधुमेह, कर्करोग, कमी रोगप्रतिकारक्षमता असलेला एचआयव्ही आहे; त्यांना साधारणतः हा आजार संभवत होता. मात्र, कोविड-१९ पश्चात रुग्णांची इम्युनिटी प्रचंड ढासळलेली असते. सोबतच या संक्रमणादरम्यान अपरिहार्य औषधांचा प्रचंड मारा, विशेषत: स्टेरॉईडचा वापर या फंगसला वाव देत आहे. चेहर्यावरील नाकाच्या अवतीभवती असलेल्या हाडाच्या पोकळीला सायनस असे म्हणतात. रोगप्रतिकारकशक्ती कमी असल्याने या गॅपमध्ये म्युकरमायकोसिस फंगस अर्थात बुरशी तयार होत असते. ही बुरशी दात, हिरड्या, डोळे आणि मेंदूपर्यंत पसरत जाते. ती मेंदूत गेल्यावर स्थिती गंभीर होते आणि मृत्यूचा धोका संभवतो. जिथे-जिथे ही बुरशी पसरत जाते, तिथे-तिथे तो भाग सडायला लागतो आणि त्यामुळे तो भाग सर्जरीद्वारे काढावा लागतो. हा काढलेला भाग नंतर रि-कन्स्ट्रक्ट करण्यात येतो. मात्र, चेहरा डॅमेज झालेला असतो.
आजाराची पूर्व लक्षणे
कोरोनानंतर सर्दी, खोकला, डोके दुखणे हे कोरोनाचेच भाग असल्याने रुग्ण दुर्लक्षित करतो. मात्र, अशीच काहीशी लक्षणे म्युकरमायकोसिसची आहेत. डोके दुखणे, दात दुखणे व हलणे, हिरड्यांत वेदना, टाळूवर काळसपणा व वेदना, चेहर्यावर वेदना, नाकातून काळा स्त्राव वाहणे, ही म्युकरमायोसिसचीच लक्षणे आहेत. यावर वेळीच निदान करवून घेत उपचार सुरू केल्यास पुढचा धोका टाळता येतो.
लक्षणे आढळताच कान-नाक-घसा तज्ज्ञांशी संपर्क साधा
हा आजार कोरोना इतकाच जीवघेणा आहे. वर्तमान स्थितीत या आजाराचा प्रसार वाढलेला दिसतो आणि वर्तमान नव्या जागतिक आकडेवारीनुसार कोरोनाच्या एक हजार कोरोना संक्रमित रुग्णांपैकी २०मध्ये हा आजार दिसून येत आहे. जर वेळीच उपचार मिळाले नाहीत तर डोळा गमवावा लागतो, कुणाचा जबडा काढावा लागतो. एकूणच जीव वाचविण्यासाठी हे सगळं करावं लागतं. हा आजार एका अर्थाने तोंडाच्या कर्करोगासारखाच असला तरी कर्करोग नाही, हे समजून घ्यावे. याची लक्षणे आढळताच डॉक्टरांशी संपर्क साधणे महत्त्वाचे आहे.
डॉ. (मेजर) वैभव चंदनखेडे
कान-नाक-घसा तज्ज्ञ,
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेयो हॉस्पिटल)
.................