लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना बाधितांची संख्या कमी होऊ लागली असताना आता मृत्यू संख्येतही घट दिसून येऊ लागली आहे. जुलै महिन्यानंतर प्रथमच सर्वात कमी मृत्यूची नोंद मंगळवारी झाली. चार बाधितांचे मृत्यू झाले. मृतांमध्ये एक ग्रामीणमधील, दोन शहरातील तर एक जिल्हाबाहेरील आहे. २३८ नव्या रुग्णांची भर पडली. रुग्णांची एकूण संख्या १०५३८३ झाली असून मृतांची संख्या ३४८४ वर पोचली आहे. आज २८२ रुग्ण बरे झाले असून कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या ९३.७० टक्के झाली आहे.
नागपूर जिल्ह्यात झालेल्या सिरो सर्वेक्षणात शहरातील ४९.७ टक्के तर ग्रामीणमधील २१.७ टक्के लोकांच्या शरीरात अँटीबॉडीज म्हणजे रोग प्रतिकार शक्ती निर्माण झाल्याचे सामोर आले आहे. परंतु वैद्यकीय तज्ज्ञाचे मते, पुढील १५ दिवस महत्त्वाचे आहेत. प्रत्येकाने मास्कचा वापर, वारंवार सॅनिटायझेशन व फिजीकल डिस्टंसिंग आदी प्रतिबंधक नियम पाळणे आवश्यक आहे. यामुळे कोरोनाची येणारी दुसरी लाट जास्त प्रभावी ठरू शकणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. मागील दोन दिवसांच्या तुलनेत आज चाचण्यांची संख्या वाढली. ३५३४ आरटीपीसीआर तर १२७७ रॅपीड अँटिजेन मिळून ४८११ चाचण्या झाल्या.
मेयोत वाढले रुग्ण
मागील तीन महिन्यानंतर पहिल्यांदाच मेडिकलमधील कोविड रुग्णांची संख्या २००वर स्थिरावली. परंतु मेयोमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले. सध्या ७३ रुग्ण उपचार घेत आहेत. एम्समध्येही रुग्णसंख्या कमी होऊन २०वर आली आहे. खासगी इस्पितळातही रुग्णसंख्या कमी झाली आहे. ११६२ रुग्ण उपचाराखाली आहेत. तर १९९३ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहे. ९८७४४ रुग्ण बरे झाले आहेत.
कोरोनाची आजची स्थिती
दैनिक संशयित : ४८११
बाधित रुग्ण : १०५३८३
बरे झालेले : ९८७४४
उपचार घेत असलेले रुग्ण : ३२५५
मृत्यू : ३४८४