लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भात सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद असलेल्या नागपूर जिल्ह्यात जुलै महिन्यानंतर पहिल्यांदाच मंगळवारी १० च्या खाली, सर्वात कमी मृत्यूची नोंद झाली. यात शहरातील ४, ग्रामीणमधील ३ तर जिल्ह्याबाहेरील १ असे एकूण ८ मृत्यू आहेत. आज ३३० बाधित रुग्ण आढळून आले. रुग्णसंख्या ९४,२३३ तर मृतांची संख्या ३,०८५ झाली. ५३० रुग्ण बरे झाल्याने कोरोनावर मात केलेल्यांचे प्रमाण ९१.५७ टक्क्यांवर पोहचले आहे.
नागपुरात पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू ४ एप्रिल तर दुसरा मृत्यू २८ एप्रिल रोजी झाला. त्यानंतर मृतांची संख्या वाढत गेली. मे महिन्यात ११, जून महिन्यात १५, जुलै महिन्यात ९८, ऑगस्ट महिन्यात ९१९, सप्टेंबर महिन्यात १,४६५ तर मागील २७ दिवसांत ५८५ रुग्णांचे बळी गेले. शहरात आतापर्यंत एकूण २१२५ तर ग्रामीणमध्ये ५५९ मृत्यूची नोंद झाली. मृत्यूचा दरही कमी झाला असून तो २.८७ टक्क्यांवर आला आहे. हा दर शून्यावर आणण्यासाठी आरोग्य यंत्रणा प्रयत्न करीत आहेत.
४,९९३ चाचण्यांमधून ४,६६३ रुग्ण निगेटिव्ह
आज २,६५१ आरटीपीसीआर तर २३४२ रॅपिड ॲन्टिजेन मिळून ४,९९३ रुग्णांच्या चाचण्या झाल्या. यात ४,६६३ रुग्ण निगेटिव्ह आले. विशेष म्हणजे, ॲन्टिजेन चाचणीत २५ रुग्णच पॉझिटिव्ह आले. एम्सच्या प्रयोगशाळेतील आरटीपीसीार चाचणीत १८, मेडिकलमधून ६०, मेयोमधून ४२, माफसूमधून शून्य, नीरीमधून ४५, नागपूर विद्यापीठातून १९ तर खासगी लॅबमधून १२१ रुग्ण बाधित असल्याचे निदान झाले.
सर्वाधिक रुग्ण मेडिकलमध्ये
सध्या शासकीयसह खासगी रुग्णालये मिळून १,५६८ रुग्ण उपचार घेत आहेत. यातील सर्वाधिक रुग्ण मेडिकलमध्ये आहेत. २३७ रुग्ण उपचाराखाली आहेत. या शिवाय, मेयोमध्ये ४८, एम्समध्ये ३५, लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये २७ तर इतर खासगी हॉस्पिटलमध्ये ५०च्या खाली रुग्ण आहेत. यात दहाच्या खाली रुग्ण असलेले बहुसंख्य हॉस्पिटल आहेत. हॉस्पिटलमधील रुग्णांच्या दुप्पट रुग्ण, ३२८७ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.
कोरोनाची आजची स्थिती
दैनिक संशयित : ४,९९३
बाधित रुग्ण : ९४,२३३
बरे झालेले : ८६,२९३
उपचार घेत असलेले रुग्ण : ४,८५५
मृत्यू : ३,०८५