राजीव सिंह / लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर जिल्ह्यात १४ ऑक्टोबरपर्यंत एकूण ५ लाख ३५ हजार ५४० नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात १६.५२ टक्के अर्थात ८८,४९९ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. देशभरात मंगळवारपर्यंत एकूण ९ कोटी ९० हजार १२२ नमुने तपासण्यात आले. राष्ट्रीय स्तरावर संक्रमणाचा दर ८.०४ टक्के आहे. यावरून राष्ट्रीय संक्रमण दराच्या तुलनेत नागपुरातील संक्रमणाचा दर दुपटीहून अधिक असल्याचे स्पष्ट होते. नागपुरात ऑक्टोबरच्या १४ दिवसांमध्ये संक्रमणाचा दर १२.४९ टक्क्यापर्यंत घसरला, हे उल्लेखनीय.
नागपुरात ११ मार्च रोजी पहिला कोरोना संक्रमित रुग्ण आढळला. त्यानंतर संसर्ग वाढत गेला. सप्टेंबर महिन्यात २४.६३ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले. अर्थात, तपासणी करणारा प्रत्येक चौथा व्यक्ती पॉझिटिव्ह होता. मात्र, ऑक्टोबरमध्ये संक्रमण आवाक्यात राहिले. १४ ऑक्टोबरपर्यंत नागपूर जिल्ह्यात एकूण संक्रमितांची संख्या ८८,४९९ होती. ऑक्टोबर महिन्यात १४ दिवसात ८३,९०१ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यातील १०,४८७ रुग्ण पॉझिटिव्ह होते.
विशेष म्हणजे, सप्टेंबरमध्ये तब्बल ४८,४५७ रुग्ण पाॅझिटिव्ह आढळले आणि संक्रमणामुळे १,४६५ मृत्यूंची नोंद झाली. सप्टेंबरमध्ये १ लाख ९६ हजार ७२२ नमुने तपासण्यात आले होते. यापूर्वी मार्चमध्ये ६६६ नमुन्यांची तपासणी झाली. त्यात १६ रुग्ण संक्रमित होते. मार्चमध्ये संक्रमणाचा दर २.४० टक्के होता. एप्रिलमध्ये तपासण्यात आलेल्या २,२७२ नमुन्यांमध्ये १२३ (५.४१ टक्के), मे महिन्यात ९,१७१ नमुन्यांतून ३९२ (४.२७ टक्के), जूनमध्ये १२,३९१ मधून ९७२ (७.८४ टक्के), जुलैमध्ये ५५,१०० नमुन्यांतून ३,८८९ (७.०५ टक्के) आणि ऑगस्टमध्ये तपासण्यात आलेल्या १,७५,३१७ नमुन्यांमधील २४,१६३ (१३.७८ टक्के) नमुने संक्रमित आले.
आरटी-पीसीआर टेस्ट अधिक
नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत शहरातील ३ लाख ९१ हजार २५५ आणि ग्रामीणमध्ये १ लाख ४४ हजार २८५ नमुने तपासण्यात आले. यात आरटी-पीसीआर टेस्ट २ लाख ८८ हजार ५३९ आणि ॲन्टिजेन टेस्ट २ लाख ४७ हजार १ करण्यात आले.
६०९ नवे संक्रमित, २९ मृत्यू
नागपूर जिल्ह्यात बुधवारी ६०९ नवीन संक्रमित आढळले आणि २९ मृत्यूची नोंद झाली. नव्या संक्रमितांमध्ये शहरातील ४०३, ग्रामीणमधून १९७ आणि जिल्ह्याबाहेरील ९ रुग्णांचा समावेश आहे तर मृतांमध्ये शहरातून ११, ग्रामीणमधून ९ आणि जिल्ह्याबाहेरील ९ संक्रमितांचा समावेश आहे. एकूण संक्रमितांची संख्या ८८,४९९ झाली आहे आणि एकूण मृत्यूंची संख्या २,८६९ इतकी झाली आहे. बुधवारी ७४३ रुग्ण संक्रमणमुक्त झाले. त्यात ४७७ शहरातील आणि ग्रामीणमधील २६६ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण ७८,२१४ रुग्ण संक्रमणमुक्त झाले आहेत. रिकव्हरी रेट ८८.३८ पर्यंत पोहोचला आहे. गेल्या २४ तासात ५४२८ नमुन्यांची तपासणी करण्यात आली.
एकूण आकडेवारी
अॅक्टिव्ह - ७,४१६
संक्रमणमुक्त - ७८,२१४
मृत्यू - २,८६९