लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संकटाचा सामना करीत असलेल्या नागपुरात मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोविडबाधित रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. याचदरम्यान जिल्हा प्रशासनाने कोरानाच्या अपेक्षित तिसऱ्या लाटेच्या नियंत्रणाची तयारी सुरू केली आहे. यासाठी मास्टर प्लॅन तयार करण्यात आला असून, तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर करण्यात आला आहे. यात ऑक्सिजन पुरवठ्यावर अधिक भर देण्यात आला आहे.
एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली होती. मेमध्ये परिस्थिती नियंत्रणात येत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाची दुसरी लाट अनपेक्षितपणे आल्याने प्रशासन हादरले होते. ऑक्सिजन, रेमडिसिविर इंजेक्शनच्या तुटवडा निर्माण झाला. ऑक्सिजन, भिलाई व ओदिशावरून आणावे लागले. मेडिकल व मेयो रुग्णालयातील खाटांची संख्या वाढविण्यात आली. दरम्यान, गेल्या २ मेपासून कोरोना रुग्णांची संख्या व मृतांची संख्या रोडावली आहे. १ मे रोजी कोरोना रुग्णांची संख्या ६,५७६ होती, ती ७ मे रोजी ४,३०६ वर आली आहे. मृतांच्या संख्येतही २० टक्के कमी आली आहे.
आता तज्ज्ञ कोरोनाची तिसरी लाट येण्याचा दावा करीत आहेत. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री राऊत यांच्या नेतृत्वात यावर नियंत्रण मिळविण्याससाठी मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांना सोपविण्यात आलेल्या या प्लॅनमध्ये ऑक्सिजन पुरवठा व काॅन्सन्ट्रेटर खरेदीवर अधिक भर देण्यात आला आहे.