लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सतत दोन दिवस जिल्ह्यातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या पाचशेहून कमी होती. परंतु बुधवारी रुग्णसंख्येत वाढ झाली व जिल्ह्यात ६८५ रुग्ण नोंदविण्यात आले. दुसरीकडे मृत्यूच्या संख्येत मात्र घट झाली. २४ तासात १६ मृत्यूची नोंद झाली. शहरातील मृत्यूसंख्या चार इतकीच होती.
मंगळवारी ४७० रुग्ण व २५ मृत्यू झाले. परंतु बुधवारी शहर व ग्रामीण भागातील रुग्णांमध्ये वाढ झाली. शहरात ३३९ तर ग्रामीणमध्ये ३४१ रुग्ण नोंदविण्यात आले. शहरात चार, ग्रामीणमध्ये सात तर जिल्ह्याबाहेरील पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला.
बुधवारी जिल्ह्यात चाचण्यांची संख्यादेखील वाढली. जिल्ह्यात १६ हजार ८४९ चाचण्या झाल्या. यात शहरातील ११ हजार ३९५ तर ग्रामीणमधील ५ हजार ४५४ चाचण्यांचा समावेश होता.
सक्रिय रुग्णसंख्या १० हजाराच्या खाली
२४ तासात जिल्ह्यातील १ हजार ७५४ रुग्ण बरे झाले. यात शहरातील ७०४ तर ग्रामीणमधील १ हजार ५० जणांचा समावेश होता. जिल्ह्यात सक्रिय रुग्णसंख्या बऱ्याच आठवड्यानंतर १० हजाराच्या खाली आली. जिल्ह्यात ९ हजार ७६३ सक्रिय कोरोनारुग्ण आहेत. ५ हजार ४६८ शहरातील तर ४ हजार २९५ ग्रामीण भागातील आहेत. जिल्ह्यातील विविध खासगी व सरकारी रुग्णालयात ३ हजार २९६ रुग्ण दाखल असून, ६ हजार ४६७ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.
कोरोनाची बुधवारची स्थिती
दैनिक चाचण्या: १६,८४९
शहर : ३३९ रुग्ण व ४ मृत्यू
ग्रामीण : ३४१ रुग्ण व ७ मृत्यू
ए.बाधित रुग्ण :४,७२,६९६
ए.सक्रिय रुग्ण : ९,७६३
ए.बरे झालेले रुग्ण : ४,५४,०९५
ए.मृत्यू : ८,८३८