- नरेश डोंगरे
नागपूर : पे लोड केपेसिटी आणि सेंट्रल ऑफ ग्रेव्हीटीतील तृट्यांमुळे नागपूर पोलिसांना ड्रोनकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याने ड्रोनच्या माध्यमातून जनजागरण करण्याचा प्रयत्न तूर्त अडखळला आहे. कुशल तंत्रज्ञाकडून या त्रुटी दूर करण्यासाठी पोलीस अधिकारी कसोटीने प्रयत्न करीत आहेत.
कोरोना प्रादुर्भावाच्या संदर्भात काही भागात अद्यापही पाहिजे तसे जनजागरण झालेले नाही. त्यामुळे अशा भागात ड्रोनच्या माध्यमातून जनजागरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी एका अत्याधुनिक ड्रोनची शुक्रवारी ट्रायल घेतली. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे ड्रोन कार्यान्वित होऊ शकला नाही. त्यामुळे शनिवारी तंत्रज्ञांची मदत घेऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे ठरले होते.
त्यानुसार आज सकाळी पासून या ड्रोनला हाय क्वॉलिटीचे स्पीकर बांधून त्याची ट्रायल घेण्यात आली. मात्र, स्पीकरचे लोड अन ड्रोनची सेंट्रल ऑफ ग्रेव्हीटी मॅच न झाल्याने आजही ड्रोन कार्यान्वित होऊ शकला नाही. त्यामुळे रविवारी कुशल तंत्रज्ञांना बोलवून हा ड्रोन कार्यान्वित करण्याचा प्रयत्न केले जाणार आहेत.
काय करणार ड्रोनकोरोनाचा धोका समजून सांगण्यासाठी पोलिसांनी आवश्यक ते सर्व उपक्रम हाती घेतले आहे. पोलिसांची गस्ती वाहने प्रत्येक भागात सकाळपासून रात्रीपर्यंत फिरून जनजागरण करीत आहेत. काही भागात सामाजिक संस्था, संघटनाच्या आणि सेवाभावी नागरिकांच्या मदतीने ऑटोतून जनजागरण केले जात आहे. हजारावर कोविड योद्धेही सक्रिय आहेत. मात्र शहरात अनेक असे भाग आहे ज्या भागात दाटीवाटीने घरे उभी आहेत. अरुंद बोळीमुळे त्या भागात पोलिसांची वाहनेच काय साधे ऑटोही जात नाही. त्यामुळे अशा भागात जनजागरण करण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी ड्रोनची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा ड्रोन मोमीनपुरा, सतरंजीपुरा, भालदारपुरा आणि अशाच अन्य गर्दीच्या, दाटीवाटीच्या भागात फिरवला जाईल. या ड्रोनला जोडण्यात आलेल्या स्पीकरमधून कोरोनाच्या प्रादुर्भावाचे धोके नागरिकांना समजावून सांगन्यात येईल. त्यांना घरातच रहा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, आवाहन केले जाईल.
रियल टाईम प्रोग्रामड्रोन कार्यान्वित करण्यासाठी गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. निलेश भरणे आणि परिमंडळ पाच चे उपायुक्त निलोत्पल कसोशीने प्रयत्न करीत आहेत. ड्रोन च्या रियल टाईम प्रोग्रामिंग वर भर दिला जात आहे. उदा. कुणी व्यक्ती, वाहनचालक ड्रोनला दिसताच त्यातून अमुक व्यक्तीने, तमुक वाहनचालक यांनी तातडीने घरात जावे, असे संदेश (अनाउन्स) हा ड्रोन देईल. या सबंधाने सर्व तयारी झाली असून, काही तृट्या शिल्लक आहेत, त्या रविवारी दूर केल्या जातील, असा विश्वास संबंधित अधिकाऱ्यांनी लोकमत जवळ व्यक्त केला आहे.