लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा धोका संपला नसला तरी कोरोना रुग्णसंख्येचा वेग मंदावला आहे. नव्या रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे, ही समाधानकारक बाब आहे. विशेष म्हणजे, देश व राज्याच्या तुलनेत नागपूर जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण १.३८ टक्क्याने जास्त आहे. देशात ८६.३६ टक्के, राज्यात ८३.४९ टक्के तर नागपूर जिल्ह्यातील ८७.७४ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात ६५८ रुग्ण व ३० मृत्यूची भर पडली. रुग्णसंख्या ८७,२३० झाली असून मृतांची संख्या २,८२०वर पोहचली आहे.
जिल्ह्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण वाढतच चालले आहे. नोंद झालेल्या रुग्णांच्या तुलनेत आज त्यापेक्षा अधिक, ८९४ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत शहरातील ६१,०४५ तर ग्रामीणमधील १५,४९३ रुग्ण असे एकूण ७६,५३८ कोरोनामुक्त झाले आहेत. सलग तिसऱ्या दिवशी देशाच्या तुलनेत जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचा दर (रिकव्हरी रेट) अधिक आहे. तर गेल्या सात दिवसांपासून राज्याच्या तुलनेत जिल्ह्याचा दर वाढलेला आहे. परंतु देश व राज्याच्या तुलनेत नागपूरच्या मृत्यूदरात किंचीत वाढ आहे. सोमवारी देशाच्या मृत्यूदर १.५३ टक्के, राज्याचा २.६४ टक्के तर नागपूर जिल्ह्याचा २.८९ वर गेला होता.
शहरात ५२९, ग्रामीणमध्ये ११८ रुग्णांची नोंद
नागपूर जिल्ह्यातील सप्टेंबर महिन्यात दोन हजारावर गेलेली रुग्णसंख्या ५०० ते ७०० दरम्यान दिसून येऊ लागली आहे. मागील आठवड्यात मृतांची संख्या १७ वर आली होती. परंतु आता यात किंचीत वाढ होताना दिसून येत आहे. आज २८३० आरटीपीसीआर तर २१०१ रॅपीड ॲन्टिजेन असे एकूण ४९३१ चाचण्या झाल्या. इतर दिवसांच्या तुलनेत या चाचण्या कमी झाल्या. शहरात ५२९, ग्रामीणमध्ये ११८ तर जिल्हाबाहेरील ११ रुग्ण पॉझिटिव्ह आले.
रुग्ण दुपटीचा दर ७१.९ दिवसांवर
नागपूर जिल्ह्यात १२ दिवसांपूर्वी रुग्ण दुपटीचा दर ४५.९ दिवसांवर होता आता तो वाढून ७१.९ दिवसांवर पोहचला आहे. विशेष म्हणजे, ऑगस्ट महिन्यात हाच दर १५ दिवसांवर तर सप्टेंबर महिन्यात २१ दिवसांवर होता.
३० सप्टेंबर : रुग्ण बरे होण्याचा दर ८०.०७ टक्के
मृत्यूदर २.९२ टक्के
रुग्ण दुपटीचा दर ४५.९ टक्के
एकूण रुग्ण ७८०१२
बरे झालेले ६२४६७
मृत्यू २५१०
१२ ऑक्टोबर : रुग्ण बरे होण्याचा दर ८७.७४ टक्के
मृत्यूदर २.८९ टक्के
रुग्ण दुप्पटीचा दर ७१.९ टक्के
एकूण रुग्ण ८७२३०
बरे झालेले ७६५३८
मृत्यू २८२०