योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरण प्रक्रियेत प्रचंड मनःस्ताप सहन करावा लागत आहे. ऑनलाइन नोंदणीनंतर स्लॉट बुकिंगसाठी त्यांना तासन् तास मोबाइल किंवा कॉम्प्युटरसमोर बसावे लागत आहे. इतके करूनही अवघ्या काही सेकंदाच्या आतच नोंदणी हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र असल्याने अनेकांच्या पदरी दररोज निराशा येत आहे. रेल्वेच्या तिकिटांप्रमाणे अवघ्या काही सेकंदात नोंदणी हाऊसफुल्ल कशी काय होत आहे, असा सवाल अनेक जण उपस्थित करत आहेत.
१ मे पासून १८ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. कोविन पोर्टल किंवा ॲपवरून अगोदर नोंदणी करणे आवश्यक आहे. मात्र नोंदणीची नेमकी वेळ कोणती असेल यासंदर्भात कुठलीही माहिती अगोदर दिली जात नाही. दुपारी तीन वाजेपर्यत कधीही नोंदणीला सुरुवात होते व अगदी काही सेकंदात संबंधित केंद्रावरील नोंदणी पूर्ण झाल्याचे संकेतस्थळावर दाखविण्यात येते. यामुळे अनेकांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे. यासंदर्भात मनपा अधिकाऱ्यांना विचारणा केल्यावर ते केंद्र शासनाकडे बोट दाखवत आहेत. मात्र नोंदणी सुरू होण्याची वेळ का ठरविण्यात येत नाही, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. यासंदर्भात मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
१० दिवसांत अवघ्या १० हजारांचे लसीकरण
नागपूर शहरात १८ ते ४५ या वयोगटातील १० लाखांहून अधिक नागरिक आहेत. प्रत्येकाचे लसीकरण करणे हे मोठे आव्हान आहे. मात्र १ मे ते १० मे या कालावधीत यापैकी केवळ १० हजार २७२ जणांचे लसीकरण झाले आहे. या वेगाने प्रत्येकाचे लसीकरण व्हायला सुमारे हजार दिवस म्हणजेच पावणे तीन वर्षे लागतील. जर एकूण लोकसंख्येच्या तुलनेत लसीकरण झालेल्यांची टक्केवारी पाहिली तर ती अवघी १ टक्का इतकी आहे.
दिवसभर कॉम्प्युटरसमोरच बसायचे का?
कोविनचे मोबाइल ॲप तसेच पोर्टल दोन्हीच्या माध्यमातून नोंदणी शक्य आहे. मात्र नोंदणी कधी सुरू होणार याची कुठलीही निश्चित वेळ प्रशासनाने जाहीर केलेली नाही. दररोज लसीकरण केंद्रदेखील बदलतात. त्यामुळे दिवसभर आम्ही कॉम्प्युटरसमोरच बसायचे का, असा प्रश्न अपूर्वा पांडे यांनी उपस्थित केला आहे.
फास्टेस्ट फिंगर्स फर्स्टचा अनुभव
आम्ही सातत्याने ऑनलाइन राहून वेळ घेण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र प्रत्यक्षात काही सेकंदात सर्व जागा बुक होत आहेत. आम्हाला फास्टेस्ट फिंगर्स फर्स्टचा अनुभव येत असून यश येत नसल्याने मनःस्ताप होतो आहे, अशी भावना पंकज जोशी यांनी व्यक्त केली.
ग्रामीण भागात जाऊन लसीकरण
शहरातील काही टेक्नोफ्रेंडली तरुण ग्रुप्समध्ये ऑनलाइन राहून एकमेकांना माहिती देत आहे. स्लॉट खुला झाला की तातडीने ते एकमेकांना कळवितात व शहरात मिळाले नाही तर ग्रामीण भागातील केंद्रांमध्ये बुकिंग करतात. यामुळे ग्रामीण भागातील तरुणांना लसीकरणाची संधी मिळत नाही.
सोशल मीडियावरील प्रयत्नदेखील अपुरे
कोव्हिनतर्फे थर्ड पार्टी अप्लिकेशनसाठी एपीआय (अप्लिकेशन प्रोग्राम इंटरफेज) खुले करण्यात आले आहे. ५ मे पर्यंत यामुळे उपलब्ध स्लॉट्सची माहिती विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सहजपणे उपलब्ध होत होती व त्याचे नोटिफिकेशन्सदेखील येत होते. मात्र सरकारने त्यात बदल केला व आता केवळ ३० मिनिटे अगोदर याची माहिती कळणार आहे. शिवाय एपीआयच्या कॉल्सला मर्यादा टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे उपलब्ध स्लॉट्सचे नोटिफिकेशन उशिरा येत असून तोपर्यंत बुकिंग फुल्ल दाखविण्यात येत आहे.