लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा ठीक होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त दिसून आली. मंगळवारी जिल्ह्यात ६ हजार २८७ नवे रुग्ण आढळले, तर ६ हजार ८६३ रुग्ण ठीक झाले. मात्र परत एकदा मृताचा आकडा शंभरहून अधिक होता व १०१ जणांनी जीव गमावला.
सोमवारी ५ हजार ९२१ रुग्ण ठीक झाले होते तर रविवारी ५ हजार ८५२ जण ठीक झाले होते. अशाच प्रकारे ठीक होणाऱ्यांची संख्या वाढत गेली तर सक्रिय रुग्णांची संख्या कमी होत जाईल. नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख ८६ हजार ३२७ बाधित आढळले असून, ७ हजार १२६ रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात २२ हजार ९०८ नमुन्यांची तपासणी झाली. यात शहरातील १७ हजार १२३ व ग्रामीणमधील ५ हजार ७८५ चाचण्यांचा समावेश होता.
शहरात कमी होतेय संख्या
नागपूर शहरात बाधितांची संख्या घटत असल्याचे चित्र आहे. परंतु ग्रामीण भागात मात्र संसर्गाची दाहकता कायम आहे. मंगळवारच्या अहवालात शहरातील ३ हजार ८१३ तर ग्रामीणमधील २ हजार ४६६ बाधित होते. मृतांमध्ये शहरातील ५४, ग्रामीणमधील ३९ व जिल्ह्याबाहेरील ८ जणांचा समावेश होता.
ठीक झालेल्यांची संख्या तीन लाखापार
नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत ठीक झालेल्यांची संख्या तीन लाखाहून अधिक झाली आहे. मंगळवारी ६ हजार ६८३ रुग्ण ठीक झाले. यात शहरातील ४ हजार ४८८ तर ग्रामीणमधील २ हजार ३७५ जणांचा समावेश होता. आतापर्यंत ३ लाख २ हजार ४८० बाधित ठीक झाले आहेत. रिकव्हरीचा दर ७८.३० वर पोहोचला आहे.
७६ हजार सक्रिय रुग्ण
नागपूर जिल्ह्यात मंगळवारी सक्रिय रुग्णांची संख्या ७६ हजार ७२१ इतकी होती. यात शहरातील ४६ हजार १७२ व ग्रामीणमधील ३० हजार ५४९ इतके रुग्ण आहेत. होम आयसोलेशनमध्ये ६१ हजार ४९९ रुग्ण असून, विविध रुग्णालयात १५ हजार २२२ रुग्ण भरती आहेत.