लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील पाच दिवसांपासून २५च्या आत असलेल्या कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत गुरुवारी किंचित वाढ होऊन ३४ झाली. मात्र, सलग पाचव्या दिवशी एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद नव्हती. शहरात २० तर ग्रामीणमध्ये १४ रुग्ण आढळून आले. नागपूर जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या ४,७७,०८६ झाली असून, मृतांची संख्या ९,०२५ वर स्थिरावली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जानेवारी महिन्यात १०,५०७, फेब्रुवारी महिन्यात १५,५१४, मार्च महिन्यात ७६,२५०, एप्रिल महिन्यात सर्वाधिक १,८१,७४९, मे महिन्यात ६६,८१८ तर जून महिन्यात सर्वांत कमी २,४४७ रुग्ण आढळून आले. जून महिन्यात हा दर ०.९१ टक्क्यांवर आल्याने आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला. नागपूर जिल्ह्यात गुरुवारी ७,६२७ तपासण्या झाल्या. पॉझिटिव्हिटीचा दर ०.४४ टक्के होता. शहरात ६३०५ तपासण्यात हाच दर ०.३१ टक्के तर ग्रामीण भागात १३२२ तपासण्यात हा दर १.०५ टक्के होता. आज १०७ रुग्ण बरे झाले असून, कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण ९८.०५ टक्क्यांवर पोहोचले आहे. २५ जूनपासून एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.
रुग्णालयात कोरोनाचे दीडशे रुग्ण
नागपूर जिल्ह्यात कोरोनाचे २६३ रुग्ण सक्रिय असून, यातील १५१ रुग्ण शासकीयसह खासगी रुग्णालयात भरती आहेत. ११२ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. शहरात सक्रिय रुग्णांची संख्या २२६ तर ग्रामीणमध्ये ३७ आहे.
कोरोनाची गुरुवारची स्थिती
दैनिक चाचण्या : ७६२७
शहर : २० रुग्ण व ० मृत्यू
ग्रामीण : १४ रुग्ण व ० मृत्यू
ए. बाधित रुग्ण : ४,७७,०८६
ए. सक्रिय रुग्ण : २६३
ए. बरे झालेले रुग्ण : ४,६७,७९८
ए. मृत्यू : ९०२५