नागपूर/औरंगाबाद : कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागल्याने बंद करण्यात आलेले अकोल्याचे सात कोविड केअर सेंटर सोमवारपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय आरोग्य विभागातर्फे घेण्यात आला आहे. शनिवारी जिल्ह्यात दोन कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहेत.
अमरावती जिल्ह्यात १४ कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहेत. यवतमाळ जिल्ह्यात ३८ कोविड केअर सेंटर, तीन कोविड डेडीकेटेड हॉस्पिटल आणि एक शासकीय कोविड रुग्णालय कार्यान्वित होते. यापैकी कोविड सेंटर बंद केले होते. ते पुन्हा सुरू केले जात आहे. वाशिम जिल्ह्यात चार ठिकाणी सोमवारपासून सेंटर सुरू होतील.
चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे ४ कोविड सेंटर पुन्हा अद्ययावत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. गोंदिया जिल्ह्यात २ सेंटर सुरू आहेत. गडचिराेली जिल्ह्यात दाेनच सेेंटर सुरू आहेत. भंडारा जिल्ह्यात कोरोना केअर युनिट त्याच स्थितीत असा आजही सुरू आहे. बुलडाणा जिल्ह्यात सर्व १३ सेंटर सुरू करण्यात येत आहेत.
कोल्हापुरात दोनच कोरोना सेंटर सुरूकोल्हापूर : शहरात रोज १० ते १५ नवीन रुग्णांची भर पडत आहे. सध्या येथे गंभीर स्थिती नसली तरी कोरोनाची दुसरी लाट शहरात येऊच नये म्हणून महापालिका प्रशासन सावध आहे. यापूर्वी १२ कोरोना केअर सेंटर सुरू होती. सध्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर) व आयसोलेशन हॉस्पिटल येथे दोन कोरोना केअर सेंटर सुरू आहेत.
जिल्हाधिकारी पाॅझिटिव्हउस्मानाबाद : मागील पाच-सहा दिवसांपासून जिल्ह्यात काेराेना बाधितांच्या संख्येत वाढ हाेत असतानाच आता जिल्हाधिकारी काैस्तुभ दिवेगावकर हेही काेराेना पाॅझिटिव्ह आले आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी लसीचा पहिला डाेस घेऊनही संसर्ग झाला असल्याने प्रश्न उपस्थित हाेत आहेत. दिवेगावकर सध्या घरामध्येच विलगीकरणात आहेत.
मराठवाड्यात प्रशासन सतर्क
औरंगाबाद महापालिकेने शहरात चार मोठे कोविड सेंटर सुरू केले आहेत. ७६५ क्षमता असलेल्या या केंद्रांवर ३०० पेक्षा अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. याशिवाय घाटी रुग्णालयात ३०० बेड आणि सिविल हॉस्पिटल मध्ये २०० बेड आहेत. उस्मानाबादमध्ये ९६० बेड क्षमतेचे ९ कोविड केअर सेंटर्स सुरू करण्यात आले आहेत. तसेच ११०० ऑक्सिजन सपोर्टेड बेड व १९६ व्हेंटिलेटर कार्यान्वित करण्यात येत आहेत. परभणीत मंगळवारपासून दोन सेंटर सुरू होतील. नांदेडमध्ये आरोग्य यंत्रणेला सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लातूर जिल्ह्यात एक कोविड सेंटर सुरू आहे. जालन्यात कोविड सेंटर सुरू करण्याबाबत सोमवारी बैठक होणार आहे.