कन्हान (जि. नागपूर) : अत्यवस्थ असलेल्या पाच कोरोनाबाधित रुग्णांना वेळेवर योग्य उपचार न मिळाल्याने त्यांचा मंगळवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास तडफडून मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना नागपूर जिल्ह्यातील कांद्री येथील वेकोलिच्या जवाहलाल नेहरू हॉस्पिटलच्या कोविड केअर सेंटर येथे घटली. मृतांच्या नातेवाइकांनी ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याचे सांगत रुग्णालयाची तोडफोड केली.अमित दीनदयाल भारद्वाज (३१), कल्पना अनिल कडू (३८), किरण राधेश्याम बोराडे (४७), हुकूमचंद पी. येरपुडे (५७) व नमिता श्रीकांत मानकर (३३), अशी मृतांची नावे आहेत.कांद्री येथील वेकोलिच्या जवाहरलाल नेहरू हॉस्पिटल येथे ९ एप्रिलपासून कोविड सेंटर सुरू करण्यात आले होते. या रुग्णालयात सोमवारी रात्रीपर्यंत २९ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू होते. यातील काही रुग्णांची स्थिती गंभीर होती. त्यांना नागपूर येथे तातडीने हलविण्याची मागणीसुद्धा करण्यात आली होती. मात्र, नागपूरच्या शासकीय रुग्णालयात बेड शिल्लक नसल्याने कांद्री येथेच त्या रुग्णावर उपचार सुरू ठेवण्यात आले. यात प्रशिक्षित डाॅक्टर आणि व्हेंटिलेटरच्या अभावामुळे चार रुग्णांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
गर्भवतीने सोडला प्राणरायनगर येथील नमिता मानकर (३३) ही गर्भवती तेथे कोरोना उपचारासाठी दाखल होती. चार रुग्णांच्या मृत्यूनंतर तेथे गोंधळ झाला. यातच तिची प्रकृती खालावली. तिला कामठी येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय नातेवाइकांनी घेतला. पण रस्त्यात तिचा मृत्यू झाला.
मृत बाधित रुग्ण उपचारासाठी दाखल करतेवेळीच गंभीर होते. त्यांना ऑक्सिजनपुरवठा करण्यात आला. पण, वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रयत्न अपुरे ठरले.- डॉ. शैला देवगडे, प्रभारी अधिकारी, कोविड केअर सेंटर