लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीची पत्नी व मामेभाऊ शुक्रवारी पॉझिटिव्ह आल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली. नागपुरात कोरोनाचे आता तीन रुग्ण झाले आहेत. राज्यात पुण्यानंतर सर्वाधिक रुग्णाची नोंद मुंबई व नागपुरात झाली आहे. एककीडे पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडत असताना संशयित रुग्णांची संख्या वाढत आहे. सायंकाळपर्यंत मेयो व मेडिकलमध्ये सहा संशयित रुग्ण दाखल झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे.अमेरिका प्रवासाची पार्श्वभूमी असलेल्या ४५ वर्षीय व्यक्तीला बुधवारी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) दाखल करण्यात आले. दुसऱ्या दिवशी या रुग्णाचे नमुने पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्याशी संपर्कात आलेल्या १४ संबंधितांचे नमुने तपासण्यात आले. यात त्यांचे सासरे, दोन्ही मुले, तपासणी करणारे दोन्ही डॉक्टर, कर्मचारी व मित्राचे असे १२ संबंधितांच्या नमुन्यांचा अहवाल गुरुवारी रात्री उशिरा निगेटिव्ह आला. परंतु त्यांच्या ४३ वर्षीय पत्नी व ४५ वर्षीय मामेभाऊ यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. परंतु अंतिम अहवाल देण्यापूर्वी शुक्रवारी या दोघांचे नमुने पुन्हा तपासण्यात आले. दुपारी या आजाराचे नोडल अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवींद्र पातुरकर यांनी या दोघांंना कोरोना असल्याचे जाहीर केले. ४५ वर्षीय पॉझिटिव्ह व्यक्तीवर मेयोच्या वॉर्ड क्र. २४ मध्ये तर त्यांच्या पत्नी व मामेभावावर मेडिकलच्या २५ मध्ये उपचार सुरू आहेत. या तिघांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. पॉझिटिव्ह आलेली महिला शिक्षिकापॉझिटिव्ह आलेली महिला शिक्षिका आहे. प्राप्त माहितीनुसार, त्यांनी नुकत्याच एका शाळेचा राजीनामा देऊन तीन-चार दिवसांपूर्वी दुसऱ्या एका शाळेत शिक्षिका म्हणून मुलाखत दिली आहे. या शाळेतील त्यांच्या दोन महिला मैत्रिणी ओळखीच्या होत्या. त्यांनी सोबत जेवण घेतल्याचेही सांगण्यात येते. यामुळे या मैत्रिणींचे व विद्यार्थ्यांचे नमुने घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोबतच मामेभावाच्या पत्नीचे व त्यांच्या संपर्कात आलेल्यांचे नमुने घेण्याची शक्यता आहे.
पुरुष रुग्णाच्या कंपनीचे कर्मचारीही संशयाच्या भोवऱ्यात पॉझिटिव्ह आलेला पुरुष रुग्णासोबत ३४, ३६, ४३ व ५३ या वयोगटातील त्याचे सहकारीही अमेरिकेला गेले होते. शुक्रवारी या रुग्णांना मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. या शिवाय, नागपुरातील त्यांच्या कंपन्यामधील काही कर्मचाऱ्यांचे शनिवारी नमुने घेण्यात येणार असल्याची माहिती आहे.
यवतमाळच्या नऊ संशयिताचे नमुने नागपुरातदुबई येथे प्रवासाला गेलेल्या नऊ संशयितांना लक्षणे नसल्याने घरीच राहण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यांच्याशी आरोग्य विभाग संपर्क साधून होता. परंतु नागपुरात एक रुग्ण पॉझिटिव्ह येताच या रुग्णांना गुरुवारी यवतमाळ मेडिकलच्या आयसोलेशन वॉर्डात दाखल करण्यात आले. शुक्रवारी यांचे नमुने मेयोच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले.
मेयोच्या प्रयोगशाळेत १६नमुनेमेयोच्या प्रयोगशाळेत यवतमाळमधील नऊ, मेडिकलमधील चार, मेयोतील दोन तर गोंदिया येथील एक असे १६ संशयित नमुने तपासणीसाठी आले. याचा अहवाल शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत येण्याची शक्यता आहे.
मेडिकलमध्ये मदत कक्ष सुरूदोन पॉझिटिव्ह आलेल्या दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. चार संशयित रुग्णांचे नमुने मेयोला पाठविण्यात आले आहेत. संशयित रुग्णांची वाढती संख्या पाहता मेडिकलचा अपघात विभाग, बाह्यरुग्ण विभाग व अतिदक्षता विभागाच्या समोर अशा तीन ठिकाणी मदत कक्ष सुरू करण्यात आले आहेत. याची मदत संशयित रुग्णांसोबत त्यांच्या नातेवाईकांना होणार आहे.डॉ. अविनाश गावंडेवैद्यकीय अधीक्षक, गावंडे