लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरातील कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढत आहे. मेयो रुग्णालयात बेड खाली नाहीत. दुसरीकडे मनुष्यबळाचीही कमी आहे. याचा विचार करता मनपाने मेयो रुग्णालयात डॉक्टर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. मनपातर्फे आतापर्यंत ९ डॉक्टर पाठविण्यात आले आहेत.
महापौर दयाशंकर तिवारी यांनी शनिवारी मेयो रुग्णालयाचा दौरा केला. त्यांनी डॉक्टर कमी असल्याने मनपा प्रशासनाला डॉक्टर पाठविण्याचे निर्देश दिले.
मेयोतील ६०० बेडपैकी ४८० बेड कोविड रुग्णांसाठी आरक्षित होते. १५ बेडवर किडनीग्रस्त रुग्णांवर उपचार केले जातात. १५ बेड बाधित गर्भवती महिलांसाठी आरक्षित आहेत. ४० बेड कोविडमधून चांगले झालेल्या रुग्णांसाठी आहेत. मेयो येथील इंटर्नशिप करीत असलेल्या ७० डॉक्टरांची परीक्षा सुरू झाली आहे. यामुळे मेयो प्रशासनाने ७५ डॉक्टरांची मागणी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी २५ डॉक्टर उपलब्ध करण्याचे आश्वासन दिले आहे. यातील १५ पाठविण्यात आले. त्यातील ७ डॉक्टर नियुक्त झाले. मनपाकडून ९ डॉक्टर पाठविण्यात आले. डॉक्टरांची कमी असल्याने उपचार करताना अडचणी येत आहेत. यामुळे मेयो प्रशासनाने मनपाला पत्र पाठवून डॉक्टर उपलब्ध करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांच्याशी महापौरांनी चर्चा केली. १५ डॉक्टर लवकरच पाठविले जाणार आहेत.