लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य सरकारने अनुदान थांबविले. त्यात महापालिका आयुक्तांनी फाईल थांबविल्याने शहरातील मूलभूत सुविधांची कामे ठप्प आहेत. खड्डे बुजवायलाही पैसे मिळत नसल्याचा आरोप सत्तापक्षाने केला आहे.
मनपा प्रशासनाच्या माध्यमातून राज्य सरकार सूड घेत आहे. मनपाचे १३१ कोटींचे अनुदान थांबविले. प्रशासन दबावात असल्याने शहरातील विकास कामे ठप्प असल्याचा आरोप मनपातील सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश भोयर, स्थापत्य समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे, महिला व बाल कल्याण सभापती दिव्या धुरडे आदी उपस्थित होते.
तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर यांनी १५० कोटींचे कार्यादेश दिले होते. परंतु त्यांच्या बदलीनंतर आलेले तुकाराम मुंढे यांनी ही कामे थांबविली. त्यानंतर आयुक्त राधाकृष्ण बी. आलेत. पण, परिस्थिती तीच आहे. गेल्या वर्षात फक्त ३५ कोटी मिळाले. या वर्षात २० कोटींच्या कामांना मंजुरी दिली. पण, अद्याप एकाही कामाला सुरुवात नाही. शहरातील नागरिकांना खड्ड्यांचा त्रास होत आहे. दुसरीकडे २०१७ मध्ये मंजुरी दिलेल्या २३ सिमेंट रस्त्यांच्या कामाला अजूनही सुरुवात नाही. नागरी सुविधांसाठी मिळणारे २५ कोटींचे अनुदानही सरकारने थांबविले. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना दक्षिण-पश्चिम नागपूरसाठी मंजूर केलेला १५७ कोटींचा निधी थांबविला होता. यातील १११ कोटी आले आहे. अशी माहिती ठाकरे यांनी दिली.
...
म्हणून रस्त्यावर खड्डे
गेल्या दोन वर्षात डांबरी रस्त्यांची कामेच झालेली नाही. मूलभूत सुविधांच्या कामांसाठी प्रशासनाकडून निधी मिळत नसल्याने नागरिकांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप अविनाश ठाकरे यांनी केला.
...
महापौरांच्या फाईलला मंजुरी
स्थायी समिती अध्यक्ष व सत्तापक्ष नेत्यांनी फाईल प्रलंबित असल्याचा आरोप केला आहे. तर, दुसरीकडे महापौरांकडून जाणाऱ्या फाईलला मंजुरी मिळते, अशी मनपात चर्चा आहे.