लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या या संकटकाळामध्ये कोरोनाबाधित रुग्णाला योग्य उपचार मिळावेत, यासाठी शासनाद्वारे खासगी रुग्णालयांकरिता ८० व २० टक्के दराचे धोरण राबविण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार रुग्णालयातील एकूण बेडच्या ८० टक्के बेड हे शासनाने ठरवून दिलेल्या दराने तर २० टक्के बेड हे रुग्णालय व्यवस्थापनाच्या निर्धारित दराने रुग्णांना उपलब्ध करणे आवश्यक आहे. मात्र नागपूर शहरात या नियमाचे सर्रास उल्लंघन होत आहे. मनपाकडे नोंद असलेल्या १४९ खासगी रुग्णालयापैकी ८५ रुग्णालयांची माहिती मनपाकडे उपलब्ध नाही. या रुग्णालयाकडून कोविड रुग्णांची सर्रास लुबाडणूक सुरू आहे.
नागपूर शहरातील खासगी रुग्णालयांनी शासन नियमानुसार बेड्स उपलब्ध केले की नाही, यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी मनपाची आहे. मात्र यावर मनपाचे नियंत्रण नसल्याने ८५ रुग्णालयांनी माहिती सादर केलेली नाही. शासन नियमानुसार, ८० टक्के बेडवर शासकीय दरानुसार बिलाची आकारणी करण्याचे निर्देश असताना, रुग्णालय व्यवस्थापन त्यांच्या दरानुसार बिल वसुली करीत आहे. यात मनपाने नेमलेले ऑडिटर मॅनेज झाले आहेत.
कोविड रुग्णांच्या वाढीव बिलासंदर्भात तक्रारी प्राप्त होत आहेत. अनेक खासगी रुग्णालयांनी ५० टक्क्यापेक्षा जास्त रुग्ण हे २० टक्के दरानुसारच दाखल केल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्वसामान्यांची लुटमार केली जात आहे. अशा खासगी रुग्णालयांना दंड करावा, अशी मागणी माजी महापौर संदीप जोशी यांनी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्याकडे केली आहे.
कारवाई करा, अन्यथा आंदोलन - जोशी
खासगी रुग्णालये रुग्णांची लुबाडणूक करीत आहे. शासनाच्या नियमानुसार ८० टक्के बेडवर शासकीय दरानुसार बिलाची आकारणी करण्याचे निर्देश असतानाही रुग्णालय व्यवस्थापन त्यांच्या दरानुसार बिल वसूल करीत आहेत. मनपाचे ऑडिटरही मॅनेज झाले आहेत. यामुळे सामान्य नागरिक भरडला जात आहे. लुबाडणूक करणाऱ्या रुग्णालयांविरोधात तातडीने कारवाई करण्यात यावी. अन्यथा येत्या चार दिवसात मनपा प्रशासनाविरुद्ध आंदोलनाची भूमिका घेण्याचा इशारा माजी महापौर तथा नगरसेवक संदीप जोशी यांनी दिला आहे.