लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड लसीकरणासाठी अतिरिक्त शुल्क घेतल्याच्या तक्रारीवरून मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार आरोग्य विभागाने शंकरनगर येथील वोक्हार्ट हॉस्पिटलला दणका दिला आहे. कोविशिल्ड लसीकरिता निर्धारित शुल्कापेक्षा घेतलेले अतिरिक्त शुल्क परत करण्याचे निर्देेश दिले आहेत.
लसीकरणासाठी खासगी लसीकरण केंद्रांवर ७८० रुपये शुल्क निर्धारित असताना वोक्हार्ट हॉस्पिटलकडून १,०५० रुपये शुल्क आकारले जात होते. याबाबत शिवानी चौरसिया यांनी मनपाच्या आरोग्य विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार मनपाद्वारे हॉस्पिटल प्रशासनाला २४ जून, २०२१ रोजी पहिली नोटीस बजावली; परंतु हॉस्पिटल प्रशासनाकडून कुठलेही उत्तर न मिळाल्याने आरोग्य विभागाने नुकतेच स्मरणपत्र पाठवून कुठलेही स्पष्टीकरण न दिल्यास मनपाद्वारे एकतर्फी कारवाई करण्याबाबत इशारा दिला.
त्यानंतर वोक्हार्ट हॉस्पिटलने चूक मान्य केली. आकारण्यात आलेले अतिरिक्त शुल्क परत करण्यात आले. रुग्णालय प्रशासनाच्या धोरणानुसार २७० रुपये हे नोंदणी शुल्क म्हणून आकारण्यात येत असल्याचे रुग्णालयाद्वारे सांगण्यात आले. आता मनपा प्रशासनाच्या निर्देशानुसार निर्धारित ७८० रुपये एवढेच शुल्क प्रत्येक लसीकरणासाठी आकारण्यात येतील. अशी माहिती हॉस्पिटल प्रशासनाद्वारे देण्यात आली.