नागपूर : दरवर्षी उन्हाळ्यात हाेणारी भीषण पाणीटंचाईची समस्या साेडविण्यासाठी शहरातील विहिरी लाभदायक ठरू शकतात. मात्र, महापालिका प्रशासन या विहिरींच्या स्वच्छतेबाबत फारसे गंभीरतेने घेत नाही. गाेपालनगरातील विहिरीबाबत हेच दिसून येत आहे. कचराघर झालेली ही विहीर स्वच्छ व्हावी म्हणून नागरिक गेल्या दाेन वर्षांपासून मागणी करीत आहेत
गाेपालनगर येथे असलेली ही सार्वजनिक विहीर गंगाधरराव फडणवीस यांनी बांधली हाेती. वस्तीतील नागरिकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटावा हा यामागचा उद्देश हाेता आणि त्यावेळी त्याचा लाभही झाला. मात्र नळ लाईननंतर विहिरींची उपेक्षा झाली. उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करताना विहिरीमुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळताे. मात्र, हळूहळू त्या विहिरी कचरा फेकण्याचे स्थान झाले. आतातर विहिरीत कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत. पाण्याची गरज लक्षात घेत नागरिकांनी ही विहीर स्वच्छ व्हावी म्हणून प्रयत्न चालविले. नगरसेवकांची भेट घेतली, लक्ष्मीनगर झाेनमध्येही निवेदन सादर केले आणि जलप्रदाय विभागाच्या अधिकाऱ्यांचीही भेट घेऊन समस्या मांडली. मात्र नगरसेवकांनी दुर्लक्ष केले, तर जलप्रदाय व लक्ष्मीनगर झाेनच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांकडे बाेट दाखवत टाळाटाळ केली. माजी महापाैर नंदा जिचकार यांनीही लक्ष दिले नसल्याचे नागरिकांनी सांगितले. गेल्या दाेन वर्षांपासून नागरिकांचा विहीर स्वच्छतेसाठी संघर्ष सुरू आहे