लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविंड संसर्गामुळे यावरचे मालमत्ता कर भरण्याचे प्रमाण कमी दिसत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी महापालिकेच्या मालमत्ता कराची वसुली १८ कोटींनी कमी आहे. वसुलीसाठी प्रशासनाने थकबाकीदारांच्या मालमत्ता लिलावात काढण्याची तयारी केली आहे. डिसेंबर महिन्यात ५१४ मालमत्तांचा लिलाव केला जाणार आहे.
१ एप्रिल ते २५ नोव्हेंबर २०२० पर्यंत ११७ कोटीची कर वसुली झाली. गेल्या वर्षी याच कालावधीत १३५ कोटी वसूल झाले होते. ३१ मार्च २०२० पर्यंत कार्यालयीन कामकाजाची संख्या ८७ दिवस आहे. या आधारावर झोनस्तरावर वसुलीचे लक्ष्य सहायक आयुक्तांना दिले आहे. गेल्या वर्षी प्रयत्न करूनही २४६ कोटीचीच वसुली झाली होती. कोविड संक्रमण नसते तर २६० कोटीची वसुली झाली असती, असा प्रशासनाचा दावा आहे
स्थायी समितीचे टार्गेट कमी
आयुक्तांनी आपल्या अर्थसंकल्पात २८९ कोटीचे लक्ष्य निर्धारित केले होते. तर स्थायी समितीचे अध्यक्ष विजय झलके यांनी २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात मालमत्ता कराचे उद्दिष्ट कमी करून २२३ कोटी ठेवले आहे. कोविड संक्रमणाचा विचार करता अर्थसंकल्पात मालमत्ता करावरील दंड माफ करण्याचा निर्णय घेतला. परंतु आयुक्तांनी त्याला अद्याप मंजुरी दिलेली नाही.
कर वसुलीवर लक्ष केंद्रित : मेश्राम
झोनच्या सहायक आयुक्तांना कर वसुलीचे लक्ष्य निर्धारित केले आहे. त्यानुसार ३१ मार्चपर्यंत ३०० कोटीची वसुली करावयाची आहे. डिसेंबर महिन्यात थकबाकीदारांच्या मालमत्ता मोठ्या प्रमाणात लिलावात काढण्यात येतील, अशी माहिती मनपाचे उपायुक्त (महसूल) मिलिंद मेश्राम यांनी दिली
३०० कोटी वसुलीचे उद्दिष्ट
महापालिकेचा मुख्य आर्थिक स्रोत असलेल्या मालमत्ता कर वसुली कोरोनाचा फटका बसला आहे. मालमत्ता कराची ५०० कोटीहून अधिक थकबाकी आहे. तर ३१ मार्च २०२१ पर्यंत ३५३ कोटी ८९ लाख वसुलीचे उद्दिष्ट असताना २५ नोव्हेंबरपर्यंत ११७ कोटीचा महसूल जमा झाला आहे. मनपाची आर्थिक परिस्थिती पाहता मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी झोननिहाय उद्दिष्ट निश्चित केले असून, त्यानुसार ३०० कोटीची वसुली करावयाची आहे. म्हणजेच दररोज जवळपास २ कोटी ७५ लाख ५ हजार रुपयाची कर वसुली करावयाची आहे. उद्दिष्टपूर्तीत नापास ठरल्यास कारवाईचा इशारा दिला आहे.
आयुक्तांनी मंगळवारी मालमत्ता कर वसुलीचा आढावा घेतला. दिलेले उद्दिष्ट प्रत्यक्षात वसुली यातील तफावत विचारात घेता, त्यांनी झोनच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
८७ दिवसात ३०० कोटीची वसुली करा
३१ मार्च २०२१ पर्यंत मालमत्ता विभागाला ३०० रुपयाची वसुली करावयाची आहे. याचा विचार करता व कामकाजाचे दिवस लक्षात घेता ८७ दिवसात ही वसुली करावयाची आहे. त्यानुसार दररोज जवळपास २ कोटी ७५ लाख ५ हजार रुपये वसुलीचे उद्दिष्ट आहे.
कोरोनाचा वसुलीला फटका
२०२०-२१ या आर्थिक वर्षात मालमत्ता करापासून थकबाकी व चालू बिलापासून ३५३.८९ कोटी वसुलीचे उद्दिष्ट ठेवले आहे. परंतु कर आकारणी व कर वसुली विभागाची यंत्रणा कोविड-१९ च्या नियंत्रणात लागली होती. याचा वसुलीवर परिणाम झाल्याने २५ नोव्हेंबरपर्यंत फक्त ११७ कोटीची वसुली झाली आहे.