राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस : प्रदूषण नियंत्रणाचा संदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिनाच्या निमित्ताने महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी बुधवारी सकाळी सायकलने कार्यालयात पोहचले. यात अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, राम जोशी, संजय निपाणे, स्मार्ट सिटीच्या सीईओ भुवनेश्वरी एस., यांच्यासह सहायक आयुक्त, अधिकारी व कर्मचारी आदींचा समावेश होता.
सर्व अधिकारी व कर्मचारी सकाळी ९.३० च्या सुमारास आकाशवाणी चौकात एकत्रित आले. आणि तेथून मनपा कार्यालयाला सायकलने आलेत. नागपूरात वायु प्रदूषणाचे प्रमाण कमी करण्याचे दृष्टिकोनातून सायकलने कार्यालयात आल्यास प्रदूषण तर कमी करण्यास मदत होईल, तसेच आरोग्यपण उत्तम ठेवता येईल. असा संदेश यातून देण्यात आला.
राम जोशी हे हिंगणा टी पाईंट जवळ स्थित आपल्या घरून आले. संजय निपाणे रामनगर येथून आलेत. जलज शर्मा आणि भुवनेश्वरी एस. हे सुध्दा आपल्या घरून आकाशवाणी चौकात सायकलने आले. या मोहिमेत उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) डॉ. प्रदीप दासरवार, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, निगम सचिव डॉ. रंजना लाडे, सहायक आयुक्त महेश धामेचा, कार्यकारी अभियंता मनोज गणवीर, परिवहन व्यवस्थापक शकील नियाजी, राष्ट्रीय नागपूर काॅर्पोरेशन एम्प्लाईज असोसिएशनचे अध्यक्ष सुरेन्द्र टिंगणे, महासचिव रंजन नलोडे, कोषाध्यक्ष प्रदीण तंत्रपाळे आदी सहभागी झाले होते.
वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.नरेंद्र बहिरवार, अतिरिक्त सहायक आरोग्य अधिकारी डॉ.विजय जोशी, पशुचिकित्सा अधिकारी डॉ.गजेंद्र महल्ले, क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर, उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे आदी अधिकाऱ्यांसह आंतरराष्ट्रीय सायकलपटू डॉ.अमित समर्थ, स्वयंसेवी संस्थांमार्फत ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे कौस्तभ चॅटर्जी, सुरभी जायस्वाल, मनपा शाळेच्या विद्यार्थिनी व शालेय राष्ट्रीय सायकलपटू खुशबू पटेल, साक्षी मडावी, पूनम पवार आदींनी मनपाच्या या उपक्रमात सहभाग घेऊन व सायकल चालवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.