महापौर : झिंगाबाई टाकळी शाळेला दिली भेट
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मोफत आणि सर्वोत्तम शिक्षण प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार आहे. वस्तीत राहणाऱ्या प्रत्येक मुलाला शिक्षण देण्यासाठी मनपाच्या बंद पडलेल्या शाळा पूर्ववत टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले. सरकारी शाळा वाचवा संयुक्त कृती समितीच्या निवेदनावरून महापौरांनी बुधवारी झिंगाबाई टाकळी मनपा प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळेला भेट दिली. यावेळी सत्तापक्षनेता संदीप जाधव, नगरसेविका अर्चना पाठक, संगीता गिऱ्हे, शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर, सरकारी शाळा वाचवा संयुक्त कृती समितीचे मार्गदर्शक अमिताभ पावडे, प्रमोद काळबांडे, संयोजक दीपक साने, सदस्य संजय भिलकर उपस्थित होते.
महापौरांनी बंद असलेल्या शाळेचा परिसर, वर्गखोल्या आणि इमारतीची पाहणी केली. शाळा पूर्ववत सुरू करण्यासाठी मनपा सकारात्मक आहे, यासाठी योग्य ते प्रयत्न सुरू आहेत. तसेच पालकांनी मुलांना मनपाच्या शाळेत पाठविण्याचे आवाहन केले. मनपाच्या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. सर्वप्रथम मनपाना शाळेचा युनिफॉर्म बदलविला, कॉम्प्युटर लॅब आणि कलादान सुरू करण्यात आले. परिणामी, मागील चार वर्षांपासून मनपाच्या शाळेतील विद्यार्थी ९० टक्के गुण घेऊन उत्तीर्ण होत आहेत. पालकांनी आपल्या मुलाचे नाव मनपाच्या शाळेत टाकावे, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांनी यावेळी केले. मनपाच्या सुरेन्द्रगड शाळेच्या दोन विद्यार्थिनींनी रामेश्वरम येथून सर्वात कमी वजनाचा उपग्रह अंतरिक्षात सोडून इतिहास रचला. मनपा शाळांचा स्तर चांगला असावा, यासाठी मुंबईच्या एका सामाजिक संस्थेसोबत मनपाचे काम सुरू आहे. यासाठी नवीन शिक्षकांची नियुक्तीदेखील करण्यात येणार आहे.
झिंगाबाई टाकळी मनपा शाळेत ठेवलेला साहित्य तत्काळ काढून शाळा स्वच्छ करण्याचे निर्देश दिले. तसेच येत्या सत्रापासून झिंगाबाई टाकळी येथील मनपाची बंद असलेली शाळा सुरू करणार असल्याची हमी महापौरांनी दिली. अविनाश पावडे यांनी महापौरांचे सरकारी शाळा बचाव कृती समितीच्या कार्यक्रमात सहभागी झाल्यावर अभिनंदन केले. त्यांनी सांगितले की नागरिकांनी सरकारी शाळा बंद करण्याचा विरोध केला पाहिजे. कार्यक्रमाचे संचालन करून आभार प्रमोद काळबांडे यांनी मानले. महापौरांना सरकारी शाळा बचाव कृती समितीचा अहवाल देण्यात आला.