-महापौरांनी घेतला आढावा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना लसीकरणासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज झाली आहे. शनिवारी २४ हजार ५०० आरोग्य सेवकांना शहरातील ५ केंद्रांवर लस देण्याला सुरुवात होणार आहे.
कोविड-१९ ची लस मनपाच्या महाल येथील लसीकरण संग्रह केंद्रात ठेवण्यात येणार आहे. मनपा दवाखाने व लसीकरण संग्रह केंद्रामध्ये आवश्यक फ्रीजची व्यवस्था करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवकांना डोस देणार आहे. दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर्स जसे पोलीस, मनपा व राजस्व विभागाचे कर्मचारी असतील. तिसऱ्या टप्प्यात ५० वर्षपेक्षा अधिक वयाचे नागरिकांना लस देण्यात येईल. यासाठी नोंदणी शासनाचे दिशा निर्देशानुसार सुरु करण्यात येईल. बुधवारी महापौर दयाशंकर तिवारी यांनी मनपा मुख्यालयातील बैठकीत तयारीचा आढावा घेतला. आयुक्त राधाकृष्णन बी. दररोज बैठक घेऊन तयारीचा आढावा घेत आहेत.
पहिल्या टप्प्यामध्ये महाल रोगनिदान केंद्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो), एम्स, डागा हॉस्पिटल या ५ ठिकाणच्या कोविड लसीकरण केंद्रावर आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येईल. प्रत्येक केंद्रावर दररोज कमाल १०० कर्मचारी याप्रमाणे सर्व कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे.
आढावा बैठकीत उपमहापौर मनिषा धावडे, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, ज्येष्ठ नगरसेवक संजय बंगाले, प्रतोद दिव्या धुरडे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन डॉ. प्रदीप दासरवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. चिलकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.नरेंद्र बहिरवार, सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, टाटा ट्रस्टचे डॉ. टिकेश बिसेन आदी उपस्थित होते.
...
तपासणी केल्यानंतर लसीकरण
लसीकरण केंद्रामध्ये प्रतीक्षा कक्ष, लसीकरण कक्ष आणि निगराणी कक्ष तयार करण्यात आले आहेत. लस लावण्यापूर्वी कर्मचाऱ्यांच्या नावाची तपासणी केली जाईल.लसीकरण करण्यापूर्वी त्यांच्या परिचय पत्राची चाचणी केल्यानंतर पोर्टलवर त्यांच्या नावाची नोंदणी केली जाईल. निगराणी कक्षामध्ये कुठल्याही प्रकारची लक्षणे आढळल्यास संबंधित व्यक्तीला योग्य उपचाराची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
....
ऐछिक व नि:शुल्क लस
कोव्हिन अॅपवर नोंदणी केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार असली तरी ती बंधनकारक करण्यात आलेली नाही. लस ही ऐच्छिक आहे. विशेष म्हणजे लस पूर्णत: नि:शुल्क आहे. जर आरोग्य सेवकांनी लस घेण्यास नकार दिला तर तशी नोंद अॅपवर केली जाईल. सध्या शहरात ५ केंद्रावर लसीकरण होणार असून लवकरच या केंद्रांची संख्या वाढवून ६० पर्यंत केली जाणार आहे.
...
एसएमएसवर केंद्राची माहिती
लसीकरणासाठी नोंदणी झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणाच्या २४ तास अगोदर ‘एसएमएस’वरून केंद्राची माहिती, वेळ आदी माहिती दिली जाईल. सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत एका केंद्रावर दररोज जास्तीत १०० नोंदणीकृत आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले जाणार आहे.