लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जागतिक पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने महापालिकेतर्फे स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्षी प्राणवायू देणाऱ्या वृक्षांची लागवड करून, शहरात ७५ ऑक्सिजन झोनची निर्मिती केली जाणार आहे, अशी घोषणा महापौर दयाशंकर तिवारी यांनी शनिवारी केली. जागतिक पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने गांधीबाग उद्यानात १,२०० प्राणवायू वृक्षांची लागवड करण्याची सुरुवात करण्यात आली. आमदार विकास कुंभारे, प्रवीण दटके, नगरसेवक संजय बालपांडे, नगरसेविका विद्या कन्हेरे, सरला नायक, उपायुक्त रवींद्र भेलावे, अमोल चौरपगार उपस्थित होते.
उत्तर नागपूर, मध्य नागपूर आणि पूर्व नागपूर येथे वृक्षांची संख्या फारच कमी आहे. मनपातर्फे सध्या अस्तित्वात असलेल्या उद्यानात, खुल्या भूखंडावर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येईल. येथे वनौषधीही लावण्यात येतील. याचा लाभ आयुर्वेदचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना होईल. पोहरा नदीच्या काठालगतही वृक्षारोपण करण्यात येणार आहे. महापौर व अन्य उपस्थित नागरिकांनी वृक्षारोपण करून मोहिमेचा शुभारंभ केला.
....
आधीची घोषणा हवेतच
मनपातील पदाधिकाऱ्यांनी मागील काही दिवसांत घोषणांचा सपाटा लावला आहे. आधीच्या घोषणांचा मात्र विसर पडला आहे. गतकाळात तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष संदीप जोशी यांनी ऑक्सिजन उद्यान निर्माण करण्याची घोषणा केली होती. अद्याप हे उद्यान अस्तित्वात आले नाही. आता अशी ७५ उद्याने अस्तित्वात येतील का, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.