नागपूर : कोरोनाचा प्रकोप पाहता नागपूर महापालिकेने हालचाली करीत दोन आरोग्य केंद्रांमध्ये एकूण २०० बेड सुरू करण्याची तयारी केली आहे. सोमवार व मंगळवारी असे दोन टप्प्यात हे सुरू होणार होते. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ऑक्सिजनचा पुरवठाच न करण्यात आल्याने हे २०० बेड कार्यान्वित होऊ शकले नाही. महापालिकेने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
महापालिकेच्या पाचपावली येथील मॅटर्निटी होममध्ये सोमवारी १०० ऑक्सिजन बेड व काटोल रोडवरील केटीनगर कोविड सेंटरमध्ये मंगळवारी १०० ऑक्सिजन बेड सुरू करण्यात येणार होते. महापालिकेने तशी घोषणा करून पूर्ण तयारी केली होती. मात्र, वेळेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ऑक्सिजनचा पुरवठाच करण्यात आला नाही. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी महापालिकेला ऑक्सिजन बेड सुरू करता आले नाहीत. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनासोबत सतत पाठपुरावा केला मात्र त्यानंतरही काहीच मार्ग निघाला नाही. एकीकडे आरोग्य सुविधेवरून महापालिकेला लक्ष्य केले जात आहे तर दुसरीकडे तयारी केली असताना ऑक्सिजन मिळत नाही, यावर महापालिकेने नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, गेली दोन दिवस एम्समध्येही पुरेसा ऑक्सिजन साठा नाही. जिल्हा प्रशासनाकडून येथेही पुरेसा पुरवठा करण्यात आलेला नाही. त्यामुळे आलेल्या अतिरिक्त १०० बेडसाठी ऑक्सिजन उपलब्ध करून देणे एम्सला कठीण जात आहे. एम्समध्ये ३० एप्रिलपर्यंत आणखी ३०० बेड वाढविण्यात येणार आहेत. मात्र, ऑक्सिजन पुरवठ्याची सद्य:स्थिती पाहता हे कठीण दिसते. यामुळे आरोग्य सेवेवरील ताण वाढणार असून, रुग्णांची बेडसाठी भटकंती आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.