लहान मुलांसाठी ३०० बेडची व्यवस्था : वैद्यकीय साहित्य खरेदीची तयारी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आरोग्य सुविधा कमी पडल्याने रुग्णांना बेडसाठी भटकंती करावी लागली. ऑक्सिजन, आयसीयू व व्हेंटिलेटर उपलब्ध नव्हते. याचा विचार करता महापालिका प्रशासनाने तिसऱ्या लाटेतील कोरोना रुग्णसंख्या गृहित धरून आपला कृती आराखडा तयार केला आहे. लहान मुलांसाठी मनपाच्या तीन रुग्णालयात १०० बेड तयार केले जात आहेत. सोबतच शहरात १५० ते २०० बेडची सुसज्ज स्वतंत्र व्यवस्था केली जात आहे.
महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार व टास्क फोर्सच्या सूचनानुसार प्रशासन कामाला लागले आहे. याबरोबर लहान मुलांसाठी बालरोग तज्ज्ञांची नियुक्ती, लहान मुलांची औषधी व मास्कची व्यवस्था केली जात असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.
तिसऱ्या लाटेची शक्यता गृहित धरून महापालिकेच्या पाचपावली, केटीनगर व इंदिरा गांधी रुग्णालयात लहान मुलांसाठी १०० बेडची व्यवस्था तातडीने केली जात आहे. पालकांच्या सोयीसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात येत आहे. तसेच १५० ते २०० बेडची स्वतंत्र व्यवस्था करण्यासाठी नागपूर विद्यापीठ, रेशीमबाग यासह अन्य जागांची पाहणी सुरू आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार सोयीची जागा निश्चित केली जाणार आहे. मनुष्यबळाची कमतरता भासू नये, तसेच लागणारे वैद्यकीय साहित्य खरेदीची तयारी करण्यात आली आहे.
महापालिका प्रशासनाने कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत शहरात आरोग्य सुविधा उभारल्या आहेत तसेच बेडची संख्या आठ हजारापर्यंत वाढविली आहे. मात्र कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेतील संसर्गाचा काळ, दैनंदिन रुग्णसंख्या, मृतांची संख्या यात वेगवेगळे अनुभव आले आहेत. पहिल्या लाटेत दैनंदिन सर्वोच्च रुग्णसंख्या ही १५०० होती, ती दुसऱ्या लाटेत पाच हजारापर्यंत गेली होती. हा अनुभव पाहता तिसऱ्या लाटेत दैनंदिन रुग्णसंख्या व उपचाराधीन रुग्णसंख्या ही मोठी राहील. असे गृहित धरून महापालिका प्रशासन तशी तयारी करीत आहे.
...
ऑक्सिजन व आयसीयू व्यवस्था
लहान मुलांसाठी महापालिकेच्या रुग्णालयात १०० बेड उपलब्ध करणार आहे. यात ऑक्सिजन, आयसीयू बेडचा समावेश राहणार आहे. दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. दैनंदिन गरज भागविताना मोठी कसरत करावी लागली होती. त्यामुळे पाचपावली येथे स्वतंत्र प्रकल्प उभारण्यात आला आहे. ऑक्सिजन बँक निर्माण केली जात आहे. पहिल्या व दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसरी लाट अधिक मोठी असण्याची शक्यता गृहित धरून नियोजन सुरू आहे.
......
अशी आहे तयारी
- लहान मुलांसाठी ३०० बेडची व्यवस्था करणे
- बालरोग तज्ज्ञांची नियुक्ती करणे
- रुग्णालयात उपलब्ध बेड वाढविणे
- टास्क फोर्सच्या सूचनानुसार नियोजन
- मनपा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट
- सुपर स्प्रेडर्सची कोरोना टेस्टिंग
- ऑक्सिजन बँक
- कॉलिंग ऑक्सिजन सेंटर
- पोस्ट कोविड सेंटर सुरू करणे
आवश्यक वैद्यकीय साहित्य व औषध खरेदी