लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेतर्फे शहरातील सहा विधानसभा क्षेत्रात सुरू करण्यात आलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेशाला सुरुवात झाली आहे. पश्चिम व मध्य नागपूर पाठोपाठ आता पूर्व नागपुरातील बाभूळबन मराठी माध्यमिक शाळेतील इंग्रजी वर्गांच्या प्रवेशाला सुरुवात झाली आहे. या शाळेमध्ये के.जी. वन, के.जी.टू आणि इयत्ता पहिली करिता प्रवेश देण्यात येत आहे.
महापौर दयाशंकर तिवारी यांच्याहस्ते प्रवेशाला सुरुवात करण्यात आली. उपमहापौर मनीषा धावडे, शिक्षण सभापती दिलीप दिवे, लकडगंज झोन सभापती मनीषा अतकरे, शिक्षण समितीच्या उपसभापती सुमेधा देशपांडे, शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर, आदी उपस्थित होते.
मनपाद्वारे पहिली इंग्रजी माध्यमाची शाळा १३ वर्षापूर्वी जी.एम.बनातवाला यांच्या नावाने उत्तर नागपुरात सुरू करण्यात आली. सुरूवातीला या शाळेमध्ये केवळ ३०० ते ३५० विद्यार्थी संख्या होती.आता १७०० विद्यार्थी आहेत. इंग्रजी माध्यमाच्या शाळांना मिळणारा प्रतिसाद आणि यासोबतच हिंदी व मराठी माध्यमासोबत वाढणारा दुरावा यामुळे मनपाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा असाव्यात हा निर्णय मनपाला घ्यावा लागला अशी माहिती महापौरांनी दिली.